Devendra Fadnavis : ‘देशाचा सर्वाधिक जीडीपी जैन समाजाकडून’,मुख्यमंत्री फडणवीसांकडून जैन समाजाच्या योगदानाचे कौतुक
चांदवड (ता. चांदवड) येथील मालसाने येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याण महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थिती लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने मालसाने येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, प्रशासन आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते.
मालसाने येथे आयोजित णमोकार तीर्थ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांनी एकत्रितपणे दर्शन घेतले. या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाला देश-विदेशातून जैन समाजाचे भाविक, संत, साधू आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचकल्याण महोत्सव हा जैन धर्मातील अत्यंत पवित्र आणि जीवनमूल्यांची शिकवण देणारा उत्सव मानला जातो.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित संत, मुनी आणि भाविकांना प्रणाम करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “आज मला अत्यंत आनंद होत आहे. पंचकल्याण महोत्सवात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. चांदवडजवळ ही एक पुण्यभूमी निर्माण झाली असून येथे येऊन आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
जैन समाजाच्या योगदानावर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाच्या विकासात जैन समाजाचे योगदान अतिशय मोठे आहे. देशाचा सर्वाधिक जीडीपी जैन समाजाकडून तयार होतो, इतकेच नव्हे तर सेवा, दान आणि मानवतेसाठी काम करण्यातही जैन समाज अग्रेसर आहे. “जे आहे ते मानवतेचे आहे, या भावनेतून जैन समाज दान करतो, हे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रभू श्रीरामांचे नाशिकशी ऐतिहासिक नाते आहे आणि त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांसाठी णमोकार तीर्थ क्षेत्र उभारण्यात आले आहे. पंचकल्याणक महोत्सव हा संपूर्ण जीवनाला दिशा देणारा असून, जीवन निर्मात्यांच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देतो. “कोणतेही ज्ञान चांगले किंवा वाईट नसते, त्याचा उपयोग कसा करतो यावर सर्व काही अवलंबून असते. जगाला वाचवायचे असेल तर या विचारांचे प्रतिपादन करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी सरकारने मदत केली आहे, मात्र अजून काही कामे बाकी आहेत. “मी आश्वस्त करतो की ही सर्व कामे वेळेत पूर्ण केली जातील. मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राहुल आहेर यामध्ये लक्ष घालतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. “आज आपण सर्वजण धन्य झालो आहोत. कुनथूगिरी महाराजांचे आशीर्वाद मिळाले. णमोकार तीर्थ ही साधी गोष्ट नसून त्यामागे मोठी तपश्चर्या आहे. संपूर्ण जगातून समाज इथे येत आहे. हे ठिकाण जीवनात अत्यंत महत्त्वाचे ठरेल,” असे पटेल म्हणाले. त्यांनी या भव्य कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन करत, णमोकार तीर्थासाठी आणखी मदत करण्याची विनंतीही केली.
