Uddhav Thackeray : ‘पत्त्यांचा बंगला कोसळणार’, उद्धव ठाकरेंनी केला मुलाखतीदरम्यान भाजप बद्द्ल मोठा दावा
राज्यातील महापालिका निवडणुकांचे मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, त्याआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून, सर्वच पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत दिलेल्या मुलाखतीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मनसेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांना दिलेल्या या विशेष मुलाखतीत ठाकरे बंधूंनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर थेट आणि स्पष्ट भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपावर गंभीर आरोप करत, येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व महापालिका आमच्या ताब्यात येणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले.
मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षात अंतर्गत बंडखोरी झाल्याचा दावा केला. “यावेळी भाजपामध्येच मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. अनेक लोक पक्षातून बाहेर पडले आहेत,” असे राऊत म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी, “जसं राज म्हणाला तसं त्यांचा पत्त्यांचा बंगला आता बेपत्ता होईल,” असा खोचक टोला भाजपाला लगावला. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
यावर पुढे बोलताना राज ठाकरे यांनी पत्त्यांच्या बंगल्याचं रूपक अधिक स्पष्ट करत म्हटलं की, “लहानपणी आपण सगळे पत्त्यांचा बंगला करायचो. भाजपाकडे पाहिलं तर त्यांचाही पत्त्यांचा बंगला आहे, पण तो उलटा आहे. सगळ्यात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सध्या भाजपाला मिळणारी बहुतांश मते ही केवळ नरेंद्र मोदी यांच्या नावावर मिळत आहेत, इतर कुणाच्याही नावावर नाहीत.
राज ठाकरे यांनी स्थलांतर आणि राज्याबाहेरील लोकसंख्येच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “महाराष्ट्रातील माणूस देशात कुठेही जाऊन राहू शकतो, असं आपल्याला सांगितलं जातं. पण इतर राज्यांमध्ये हे तत्त्व तितकंच लागू होतं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इतर राज्ये आपल्याकडे येणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवतात, मात्र महाराष्ट्रातच ‘कोणीही कुठेही राहू शकतो’ असे आपलेच लोक सांगतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने आगामी महापालिका निवडणुकांत मोठा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे बंधूंची ही एकजूट नेमका काय परिणाम दाखवते, हे 16 जानेवारीनंतर स्पष्ट होणार असले तरी, सध्या तरी त्यांच्या विधानांनी राजकारणात नवा रंग भरला आहे.
