Maharashtra Weather Update : सणासुदीच्या काळात पावसाचा इशारा; पुढे पाच दिवस बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
थोडक्यात
देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर हवामानातील अनिश्चिततेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे आगमन होणार
21 ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत वादळी पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.
Maharashtra Weather Update : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर हवामानातील अनिश्चिततेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे आगमन होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. भर दिवाळीच्या काळात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 21 ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत वादळी पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. गेल्या दोन महिन्यांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, घरं आणि शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, तर जनावरांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीतून लोक सावरण्याआधीच पुन्हा पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
21 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 ऑक्टोबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा या भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या तिन्ही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 25 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, दिवाळीच्या काळात अशा प्रकारचा पाऊस कृषी पिकांसाठी तसेच ग्रामीण भागातील साठवलेल्या धान्यांसाठी नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचना पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.