Pune Grand Tour : पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची धूम; आज शाळांना सुट्टी, वाहतुकीत मोठे बदल
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर आज आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उत्साहात रंगणार आहेत. ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा आज (शुक्रवारी, २३ जानेवारी) शहरात पार पडत असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे महापालिका हद्दीतील सर्व सरकारी व खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सह-पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ही सायकल शर्यत शहराच्या मध्यवर्ती आणि गर्दीच्या भागातून जाणार असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी ४ हजार ३८१ पोलीस कर्मचारी, १२ पोलीस उपायुक्त, तसेच वाहतूक पोलीस आणि स्वयंसेवकांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
ही सायकल स्पर्धा बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथून सकाळी सुरू होणार असून, बालगंधर्व रंगमंदिर येथे तिचा समारोप होईल. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्पर्धेच्या ७५ ते ९५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे.
राधा चौक (बाणेर), सूस रोड, पाषाण, पुणे विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता, कर्वे रस्ता, वनाज, नळस्टॉप, टिळक रस्ता आणि अप्पा बळवंत चौक या महत्त्वाच्या भागांतून शर्यत मार्गक्रमण करणार आहे. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत पाषाण, लॉ कॉलेज रोड आणि सातटोटी चौक येथील रस्ते आवश्यकतेनुसार पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहेत.
वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्पर्धेच्या मार्गावर कोणतीही वाहने उभी करू नयेत. तसेच प्रेक्षकांनी बॅरिकेड्सच्या मागे राहूनच खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे. प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
