Sanjay Raut : ‘जागावाटपाचा विषय आमच्याकडून संपला’,संजय राऊतांचा स्पष्ट इशारा
मुंबई महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला असून, जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “जागावाटपाचा विषय आमच्याकडून संपला आहे. आम्ही आता थेट कामाला लागलो आहोत,” असं ठामपणे सांगत संजय राऊत यांनी सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला.
मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्ष एकत्र येतात, तेव्हा जागांची देवाणघेवाण होणे स्वाभाविक आहे. काही जागा गेल्यानंतर त्या-त्या पक्षातील इच्छुक कार्यकर्ते नाराज होतातच. मात्र कार्यकर्त्यांना समजावून घेऊनच निवडणूक लढवावी लागते.” मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आज ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, ठाकरे गटाकडूनही २८ उमेदवारांची अधिकृत यादी समोर आली आहे. त्यामुळे जागावाटपावरून सुरू असलेले मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
“काँग्रेस असो किंवा शिवसेना, अजित पवार स्वतंत्र लढत आहेत का?” असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, सध्या शिंदे गटात असंतोषाचं वातावरण असून ठाण्यात राजीनामा सत्र सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. बंडखोरीच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी जहरी टीका केली. “हे १८५७ चं बंड आहे का? नाही. पक्षाने कार्यकर्त्यांना खूप काही दिलं असतं, पण एखाद्या वेळी पक्ष देऊ शकत नाही, याला बंड म्हणता येत नाही. शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केलं, कसलं बंड? घंटा. आज त्यांना बूट चाटावे लागत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
पुण्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “पुण्यात लवकरच चित्र स्पष्ट होईल. तीन ते चार पक्ष एकत्र असून योग्य निर्णय घेतला जाईल. आम्ही राष्ट्रवादीसाठी जागा सोडल्या आहेत. आमच्याकडून ज्या जागा सोडायच्या होत्या त्या सोडल्या असून, आमच्याकडून विषय संपला आहे. त्यांना आणखी जागा हव्या असतील, तर त्या मनसेच्या कोट्यातील आहेत.”
काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी युतीबाबत बोलताना राऊत यांनी या युतीचं स्वागत केलं. “ते आमच्यासोबत नसले तरी हरकत नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेसशी वैचारिक वाद होता,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार–अदानी प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले, “शरद पवारांचं पुस्तक लोकांनी वाचावं. त्यातून सगळं स्पष्ट होईल. अदानीसारख्या उद्योजकाला त्यांनी घडवलं. एका मराठी माणसाला मार्गदर्शक मानणं हा अभिमानाचा विषय आहे.”
