Maharashtra Weather news : राज्यात पारा पुन्हा घसरला, देशात कुठं वाढतोय गारठा?
महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये गेले काही दिवस अचानक कमल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आणि यामुळं राज्यातील थंडीनं दडी मारल्याचं चित्र होतं. राज्यात पुन्हा एकदा आता मात्र हीच थंडी जोर धरत असून, किमान तापमानात आणखी घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार राज्यात पारा पुन्हा घसरण्यास सुरुवात झाली असून, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कोकणासारख्या भागांमध्येसुद्धा रात्री उशिरा ते पहाटेसुद्धा हवेत गारवा जाणवू लागला आहे.
राज्यात मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये पुढील 24 तासांमध्ये प्रामुख्यानं तापमानात आणखी घट होण्यास सुरुवात होईल. नागपुरात मागील 24 तासांमध्ये तापमान 8.5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याचं पाहायला मिळालं असून हे यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान ठरलं. ज्यामुळं नागपुरात थंडीचा कडाका वाढल्याचं आता स्पष्ट होत आहे. हवामान तज्ज्ञांनी नव्या आठवड्यात तापमानात आणखी 2°C ची घट अपेक्षित असल्याचा इशारा दिला आहे.
थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट....
वर्धा, भंडारा आणि गोंदिया या पूर्व विदर्भातील भागांना हवामान विभागानं थंडीच्या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी केला आहे. तर, ही थंडी राज्याच्या इतर भागांमध्येसुद्धा हजेरी लावताना दिसेल. घाटमाथ्यावरील भागांमध्ये दिवसासुद्धा धुकं पाहायला मिळणार असून, याचा परिणाम दृश्यमानतेवर होणार असल्यानं वळणवाटांमधून प्रवास करताना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन यंत्रणांनी केलं आहे.
कोकणात काय स्थिती?
कोकणातील काही ठिकाणी किनारपट्टी क्षेत्र असल्यानं दुपारच्या वेळी हवेत आर्द्रतेमुळं उष्मा जाणवेल. मात्र रात्रीच्या वेळी हवेत गारठा निर्माण होणार असून पहाटेपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. 32 ते 33 अंश सेल्सिअसदरम्यान इथं कमाल तापमान राहील असा प्राथमिक अंदाज आहे.
देशातील हवामानाचा अंदाज...
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुन्हा एकदा देशातील हे ऋतूचक्र फिरणार असून, पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यानं उत्तराखंड, तामिळनाडूसह दक्षिण भारतातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडच्या पर्वतीय आणि मैदानी भागांना पावसाच्या तुरळक सरींचा इशारा असून, पर्वतरांगांमध्ये बर्फाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशातही थंडीचा कडाका वाढणार असल्यानं येथे हिमवर्षावाचा अंदाज आहे. IMD च्या प्राथमिक अंदाजानुसार तामिळनाडू, आंध्रप्रदेशसह दक्षिण भारतात पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा अल्यानं इथं नागरिकांना सावध करण्यात आलं आहे.

