Weather Update : मान्सून संदर्भात हवामान विभागाचा चिंता वाढवणारा अंदाज...
थोडक्यात
देशासह राज्यामध्ये यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल
येत्या 12 ते 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून भारतातून पूर्णपणे परतेल
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता
देशासह राज्यामध्ये यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता, महाराष्ट्रात सरासरी सात जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. मात्र यंदा 26 मे रोजीच त्याचं राज्यात आगमन झालं होतं. यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे, घरादारात पाणी शिरलं आहे. शेतीमधील पिकंच नाही तर शेती देखील वाहून गेली आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास असा निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसानं राज्यभरात धुमाकूळ घातलेला असतानाच आता भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानं चिंता वाढवली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आता पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. 15 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. येत्या 12 ते 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून भारतातून पूर्णपणे परतेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मात्र जाता-जाता पुन्हा एकदा पाऊस मोठा दणका देणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे. 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवमान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील दोन दिवस ओडिशा, आंध्र प्रदेश, आणि झारखंडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राला देखील हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यंदा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला आहे, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे, दरम्यान पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.