Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update

Weather Update : पुढील 24 तास महत्त्वाचे! ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण

राज्यात सध्या हिवाळ्याचा प्रभाव कायम असतानाच हवामानात अनपेक्षित बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यात सध्या हिवाळ्याचा प्रभाव कायम असतानाच हवामानात अनपेक्षित बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार असून, काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंतर्गत महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात असून अनेक ठिकाणी थंडीची तीव्रता वाढली आहे.

अहमदनगरमध्ये किमान तापमान ११.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून जेऊरमध्ये तापमान ११ अंशांपर्यंत घसरले आहे. मोहोळमध्ये ११.८ अंश, नाशिक व साताऱ्यात १२.६ अंश, महाबळेश्वरमध्ये १३.१ अंश, तर जळगावमध्ये १३.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव येथे किमान तापमान १४ अंशांवर स्थिर असून बीडमध्ये १६ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.

कोकणात ढगाळ वातावरण, हलक्या सरींचा अंदाज

कोकण आणि मुंबई परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई-ठाणे परिसरात सकाळी हलक्या धुक्यासह तुरळक पावसाच्या सरी पडल्या. दुपारी आकाश अंशतः ढगाळ राहणार असून किनारपट्टी भागात मध्यम ते जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. मुंबईत कमाल तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

मुंबईत थंडीचा प्रभाव सौम्य

मुंबई महानगर परिसरात थंडीचा प्रभाव तुलनेने सौम्य आहे. कुलाबा येथे किमान तापमान १९.३ अंश तर सांताक्रूझ येथे १७.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ठाणे परिसरात किमान तापमान २० अंशांच्या आसपास असून दिवसा ऊन आणि हलक्या वाऱ्यांमुळे हवामान कोरडे राहिले. पुढील दोन दिवसांत ढगांचे प्रमाण वाढणार असले तरी मुसळधार पावसाची शक्यता नाही.

तापमानात चढ-उतार कायम

निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा आणि अमरावती या ११ जिल्ह्यांत सोमवार व मंगळवारी ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. ६ फेब्रुवारीपर्यंत काही भागांत थंडी कमी होईल, मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com