Mumbai Local Crowd : मुंबई लोकलमधील प्रवासी संख्या घटली, तरीही पीक अवरमध्ये गर्दी कायम; नेमकं कारण काय?

Mumbai Local Crowd : मुंबई लोकलमधील प्रवासी संख्या घटली, तरीही पीक अवरमध्ये गर्दी कायम; नेमकं कारण काय?

मुंबईतील सर्वात गजबजलेले रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबईतील सर्वात गजबजलेले रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. वर्ष २०२२–२३ मध्ये सीएसएमटी स्थानकावरून सुमारे ४२ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. मात्र २०२५–२६ या आर्थिक वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत हीच संख्या २४ कोटींवर आली आहे. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या प्रमुख १० रेल्वे स्थानकांवरही हीच स्थिती असल्याचे चित्र आहे. तरीदेखील सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरच्या वेळेत लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत असल्याने, “प्रवासी संख्या घटली तरी गर्दी कायम कशी?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मध्य रेल्वेचे जाळे सीएसएमटी ते खोपोली, आसनगाव, पनवेलपर्यंत तसेच नेरुळ ते खारकोपर आणि ठाणे ते पनवेलपर्यंत विस्तारलेले आहे. या मार्गांवर दररोज १,८१० लोकल फेऱ्यांद्वारे सुमारे ३८ लाख प्रवासी प्रवास करतात. कोरोनापूर्वी मध्य रेल्वेवरून दररोज जवळपास ४२ लाख प्रवासी प्रवास करत होते. कोरोनानंतर प्रवासी संख्या हळूहळू पूर्ववत होत असली, तरी अद्याप ती पूर्णपणे ४२ लाखांपर्यंत पोहोचलेली नाही. तरीही उपनगरीय लोकल गाड्यांतील गर्दी मात्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

तज्ज्ञांच्या मते, यामागे कामकाजाच्या ठिकाणांतील बदल हे एक प्रमुख कारण आहे. अनेक मोठी कार्यालये आणि आयटी कंपन्या बीकेसी, अंधेरी, गोरेगाव, वांद्रे-कुर्ला संकुल यांसारख्या भागांत स्थलांतरित झाल्या आहेत किंवा नव्याने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ठराविक वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून, पीक अवरमध्ये गर्दी तीव्र होत आहे.

लोकलमध्ये चढणे-उतरणेही जिकिरीचे

सकाळी आणि संध्याकाळी लोकलमध्ये चढणे-उतरणे हे प्रवाशांसाठी मोठे आव्हान बनले आहे. याचे भीषण उदाहरण जून महिन्यात मुंब्रा स्थानकात पाहायला मिळाले. अप आणि डाउन जलद मार्गावरून धावणाऱ्या दोन लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा अडकल्याने गंभीर अपघात झाला होता. या घटनेनंतर लोकलमधील प्रचंड गर्दीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मात्र, रेल्वेच्या तिकीट विक्रीचे आकडे मात्र वेगळेच चित्र दर्शवत आहेत.

दरम्यान, प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून काही सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. कांदिवली आणि बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम वेगाने सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर बोरिवली ते चर्चगेट दरम्यान २२ नवीन लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. ही सेवा जानेवारीपासून उपलब्ध होण्याची शक्यता असून, नवीन वेळापत्रकात त्याचा समावेश केला जाणार आहे.

जानेवारीपासून बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान २२ नवीन लोकल फेऱ्या

पश्चिम रेल्वे कांदिवली आणि बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम वेगाने सुरू करत आहे. पूर्ण झाल्यानंतर, बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान लोकल ट्रेन सेवांची संख्या २२ ने वाढेल, ज्यामुळे प्रवाशांच्या सोयीत लक्षणीय सुधारणा होईल. ही सेवा जानेवारीमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. लवकरच नवीन वेळापत्रकात हे दिसून येईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या प्रकल्पाच्या पूर्णतेची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात होती. पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी काम अत्यंत अचूकतेने केले जात आहे. याव्यतिरिक्त, उपनगरीय रेल्वे नेटवर्कची प्रवासी क्षमता वाढवण्याचे दीर्घकाळ प्रलंबित काम देखील मजबूत केले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com