Solapur To Mumbai : सोलापूर-मुंबईकरांना मोठा दिलासा! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 'हे' नवे बदल
रेल्वेने प्रवास करणाऱ्या सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोलापूर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता 16 ऐवजी तब्बल 20 डबे असतील. यामुळे विशेषतः सुट्ट्यांमध्ये आणि गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोलापूर - पुणे - कल्याण - ठाणे मार्गावर धावणाऱ्या या गाडीला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे वाढत्या मागणीचा विचार करता रेल्वे प्रशासनाने चार अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या वाढीमुळे वर्षभरात सुमारे 89 हजार प्रवाशांना अतिरिक्त प्रवासाची संधी मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः सोलापूर, कुर्डूवाडी, पुणे, कल्याण, ठाणे आणि मुंबई परिसरातील नियमित प्रवाशांना याचा थेट फायदा होईल. अनेकदा वेटिंग यादीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता अतिरिक्त कोचमुळे वेटिंग लिस्ट कमी होणार असून प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, ही सेवा आणखी लोकाभिमुख ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.