Sanjay Raut : “सूरतला गेलेलं तेच विमान दुसऱ्या दिवशी अजितदादांना…”, संजय राऊतांचा संशयाचा इशारा

Sanjay Raut : “सूरतला गेलेलं तेच विमान दुसऱ्या दिवशी अजितदादांना…”, संजय राऊतांचा संशयाचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाची तटस्थ आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, “अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून न होता स्वतंत्र आणि तांत्रिक पातळीवर झाली पाहिजे. हा केवळ अपघाताचा विषय नाही, तर तो तांत्रिक, रहस्यमय आणि राजकीय स्वरूपाचा आहे.” त्यांनी पुढे दावा केला की, “आदल्यादिवशी एक विमान गुजरातमधील सूरत येथे जाते आणि दुसऱ्याच दिवशी तेच विमान अजित पवारांना घेण्यासाठी बारामतीत येते व कोसळते. हा योगायोग आहे का, याची चौकशी व्हायला हवी.”

राऊत यांनी पूर्व विदर्भातील एका नेत्यावरही अप्रत्यक्षपणे संशय व्यक्त केला. “तो नेता कोणत्या पक्षाचा आहे? भाजपचा की राष्ट्रवादीचा? जर त्या नेत्याने मुद्दाम उशिरा भेट घेऊन अजित पवारांचा मोटारीने जाण्याचा कार्यक्रम रद्द करायला लावला असेल, तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे,” असा सवाल त्यांनी केला. “एखाद्या फाईलवर सही झाली नसती तर महाराष्ट्र थांबला असता का?” असा टोला देखील त्यांनी लगावला. दरम्यान, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्ली दौऱ्यावर असल्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मात्र पक्षात सर्व काही आलबेल नाही, एवढेच मी सांगू शकतो.”

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आल्यास शिवसेनेची भूमिका काय असेल, यावर राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “संसदेत लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिले जात नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरही आवाज उठवू दिला जात नाही. ओम बिर्ला हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा असेल,” असे त्यांनी सांगितले. एपस्टिन फाईल्स प्रकरणावरून ब्रिटिश पंतप्रधानांवर दबाव असल्याच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “ब्रिटनमध्ये दबावामुळे राजीनामे होतात, पण आपल्या देशात दबावाला कोण विचारतो?” संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com