Arabian sea : अचानक उकळायला लागलं समुद्राचं पाणी, पालघर ते गुजरात आपत्ती यंत्रणा हाय अलर्टवर

Arabian sea : अचानक उकळायला लागलं समुद्राचं पाणी, पालघर ते गुजरात आपत्ती यंत्रणा हाय अलर्टवर

भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेल्या अरबी समुद्रात एक धक्कादायक आणि रहस्यमयी घटना समोर आली आहे. गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळत असल्याचे दृश्य दिसून आले
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेल्या अरबी समुद्रात एक धक्कादायक आणि रहस्यमयी घटना समोर आली आहे. गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळत असल्याचे दृश्य दिसून आले असून, त्यामुळे मच्छिमारांसह प्रशासनामध्येही एकच खळबळ उडाली आहे. काही स्थानिक मच्छिमारांनी समुद्राच्या पृष्ठभागावरून निघणारे भयानक बुडबुडे आणि पाण्याच्या मध्यभागी तयार होणाऱ्या जोरदार लाटांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये समुद्राचे पाणी जणू चुलीवर ठेवलेल्या भांड्यातील पाण्यासारखे उकळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही घटना अत्यंत असामान्य असून, सामान्य समुद्री लाटांपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या घटनेचा संभाव्य धोका लक्षात घेता महाराष्ट्रातील पालघर ते गुजरातपर्यंतच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

समुद्राच्या किनारी भागात पाणी उकळत असल्यामुळे मच्छिमारांची चिंता वाढली असून, प्रशासनानेही तातडीची दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांना पाण्याखाली असलेल्या मोठ्या औद्योगिक पाइपलाईनमध्ये गळती झाल्याची शक्यता वाटत आहे. तसेच ही घटना अज्ञात भूगर्भीय हालचाली, विषारी वायूंची गळती किंवा गॅस उत्सर्जनाशी संबंधित असू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या रहस्यमयी घटनेबाबत बोलताना पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की, “ही घटना अत्यंत गंभीर आणि असामान्य आहे. मच्छिमारांनी पाठवलेल्या व्हिडिओंमध्ये समुद्राचा मोठा भाग सतत उकळत असल्याचे दिसत आहे. ही सामान्य नैसर्गिक लाट नसून खोल समुद्रातील एखादी मोठी प्रक्रिया यामागे कारणीभूत असू शकते.”

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सागरी तज्ज्ञ, औद्योगिक संस्था आणि तांत्रिक पथकांना तातडीने पाचारण करण्यात आले आहे. पाण्याचे नमुने गोळा करून त्यातील रासायनिक घटकांचा अभ्यास केला जात आहे. दरम्यान, पालघर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मच्छिमारांना या भागापासून दूर राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच या समुद्री मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांनाही विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर ही घटना गॅस गळतीशी संबंधित असेल, तर आग लागण्याचा किंवा ऑक्सिजन पातळी कमी होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मोठा अपघात टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com