Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवात बाप्पाच्या विविध...
Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवात बाप्पाच्या विविध रुपांचे रहस्य; प्रत्येक मूर्तीचा खास अर्थ, जाणून घ्या...Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवात बाप्पाच्या विविध रुपांचे रहस्य; प्रत्येक मूर्तीचा खास अर्थ, जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवात बाप्पाच्या विविध रुपांचे रहस्य; प्रत्येक मूर्तीचा खास अर्थ, जाणून घ्या...

गणेशोत्सव 2025: बाप्पाच्या विविध रुपांचे रहस्य उलगडले, जाणून घ्या प्रत्येक मूर्तीचा खास अर्थ.
Published by :
Team Lokshahi
Published on

वर्षभर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो दिवस अखेर आला आहे. उद्या म्हणजेच बुधवारी घराघरांत गणरायाची स्थापना होणार असून भक्तमंडळींमध्ये प्रचंड उत्साह आहे. मुर्तीकलाकारांच्या कारखान्यांत विविध रुपातील बाप्पाच्या मुर्त्या सजल्या आहेत. कुठे बसलेला बाप्पा, कुठे नृत्य करताना दिसणारा बाप्पा, तर कुठे विश्रांती घेत असलेला गणेश यामुळे प्रत्येक घरात येणाऱ्या विघ्नहर्त्याचं वेगळं महत्त्व असतं. पण गणेशभक्तांनी लक्षात ठेवायला हवं की बाप्पाच्या प्रत्येक रुपाचं एक खास रहस्य आहे.

डाव्या सोंडेचा गणपती, ज्याला वक्रतुंड म्हणतात, हा सर्वात लोकप्रिय मानला जातो. चंद्राच्या उर्जेशी निगडित असलेल्या या रुपातून शांती, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक दिसतं. त्यामुळे डाव्या सोंडेचा गणपती लक्ष्मीचा आशीर्वाद देणारा मानला जातो. तर उजव्या सोंडेचा गणपती, ज्याला सिद्धिविनायक म्हणतात, हा दक्षिणाभिमुखी रुप असल्याने आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवतो आणि घरातील अडचणी दूर करतो, असं मानलं जातं.

सर्वात खास आणि दुर्लभ रुप म्हणजे सरळ सोंडेचा गणपती. या रुपातील सोंड सरळ वरच्या दिशेने असते जी आपल्या शरीरातील मन आणि आत्म्याला जोडणाऱ्या सुषुम्ना नाडीचं प्रतीक आहे. या नाडीचं उघडणं म्हणजे भक्त आणि देव यांच्यातील खोल संवादाचं चिन्ह मानलं जातं. त्यामुळे हे रुप जीवनात शांती, संतुलन आणि आध्यात्मिक ऊर्जा आणतं.

घराघरांत बहुतेक वेळा बसलेल्या बाप्पाची स्थापना केली जाते. बसलेल्या बाप्पाला घरातील शांती, सुख आणि समृद्धी टिकवणारा मानलं जातं. अशी मूर्ती घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि इच्छा पूर्ण होतात. दुसरीकडे, नृत्य करताना किंवा वाद्य वाजवत असलेल्या गणेशमूर्ती विशेषतः कलाकारांसाठी शुभ मानल्या जातात. अशा गणपतीची पूजा केल्यास कलाक्षेत्रात यश मिळतं आणि घरात कायम आनंद नांदतो.

झोपलेल्या बाप्पाच्या मुर्तींनाही वेगळं महत्त्व आहे. उद्योजक किंवा व्यवसायिक मंडळी अशा मुर्तींची स्थापना करतात कारण त्या प्रगती, सुख-समृद्धी आणि आर्थिक स्थैर्याचं प्रतीक मानल्या जातात. तर उंदरावर बसलेल्या गणपतीच्या रुपाला धैर्य आणि शौर्याचं प्रतीक मानलं जातं. अशी मूर्ती घरात बळ, आत्मविश्वास आणि जबाबदाऱ्या निभावण्याची ताकद देते.

गणेशोत्सव म्हणजे भक्तिभाव, श्रद्धा आणि आनंदाचा मिलाफ. पण आपल्या घरी येणारा गणराय कोणत्या मुद्रेत आहे, त्याचं रहस्य काय आहे हे प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक रुप भक्तांच्या जीवनाला वेगळी दिशा देतं आणि विघ्नहर्ता गणराय आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com