Maharashtra Ration Card : तुमचं रेशन कार्ड रद्द तर होणार नाही ना; जाणून घ्या राज्य सरकारचे नवे नियम
राज्य सरकारने नव्या आर्थिक वर्षात अनेक नवीन मोहीम आणि बदल राज्यात लागू केले आहेत. त्यातच महत्त्वाचं म्हणजे राज्यभरातील अपात्र रेशन कार्ड शोधमोहीम १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. एक महिना राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेतून बांगलादेशी घुसखोरांसह इतर विदेशी नागरिकांचा शोध घेतला जाणार आहे. बांगलादेशी घुसखोर आणि विदेशी नागरिकाला रेशन कार्ड देण्यात आल्याचे आढळल्यास ते रद्द केले जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी याबाबतचा एक आदेश काढला असून अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच कार्डाची तपासणी केली जाईल. तसेच जी कार्डे अपात्र असल्याचे आढळतील, ती लगेच रद्द केली जाणार आहेत.
दरम्यान, रेशन दुकानदारांना त्यांच्याकडील कार्डाची तपासणी करण्यासाठी फॉर्म दिले जाणार आहेत. या फॉर्मच्या माध्यमातून अपात्र नागरिकांची यादी समोर येईल. या फॉर्मसोबत वास्तव्याचा पुरावा सोबत द्यावा लागणार आहे. हा पुरावा एक वर्षापेक्षा जुना नसावा ही मुख्य अट असेल. कार्डधारकांकडून आलेल्या माहितीची तपासणी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाईल. पुरावा सादर न केल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तसेच एका पत्त्यावर दोन रेशन कार्ड आढळल्यास किंवा एका कुटुंबात दोन कार्डे दिलेली असल्यास त्यातील एक रद्द केले जाणार आहे.