Maharashtra Weather
Maharashtra Weather

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका, पण पुढील दिवसांत तापमान वाढण्याचे संकेत

मुंबईकरांना मात्र असा अनुभव क्वचितच येतो. मात्र, रविवारी रात्रीपासून मुंबईच्या तापमानात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शहरात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बोचरी थंडी ही नेहमीची बाब असली तरी, मुंबईकरांना मात्र असा अनुभव क्वचितच येतो. मात्र, रविवारी रात्रीपासून मुंबईच्या तापमानात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शहरात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे या मोसमातील किमान तापमानाची नीचांकी नोंद झाल्याने मुंबईकरांनीही ग्रामीण भागासारखी बोचरी थंडी अनुभवली.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, रविवारी रात्री कुलाबा येथे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे १५.९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान या हिवाळी हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ठरले आहे. कुलाबा येथे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा २.१ अंशांनी कमी होते. तर सांताक्रूझ येथे कमाल तापमान २७.५ अंश सेल्सिअस इतके होते, जे सरासरीपेक्षा तब्बल ३.४ अंशांनी कमी आहे. किमान आणि कमाल तापमानात झालेल्या एकत्रित घसरणीमुळे मुंबईतील थंडी अधिक बोचरी ठरली.

हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव आणि निरभ्र आकाशामुळे रात्री उष्णतेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे पुढील एक ते दोन दिवस मुंबईत रात्री व पहाटे थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या थंडीचा प्रभाव कायम आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले जात आहे. जळगाव (११.८ अंश), नाशिक (११.४ अंश) आणि महाबळेश्वर (१३.१ अंश) येथे सकाळच्या वेळेत गारठ्याची जाणीव होत आहे.

कोकण पट्ट्यात तुलनेने उबदार स्थिती असली तरी रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे. रत्नागिरी (१६.२ अंश), डहाणू (१५.३ अंश) आणि हरनाई (१९ अंश) येथेही थंड हवामान नोंदवले गेले आहे. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते, पुढील तीन दिवसांत राज्यातील तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र २३ आणि २४ जानेवारीदरम्यान काही भागांत किमान तापमानात थंडीची हलकी झुळूक जाणवू शकते. त्यानंतर पुन्हा दोन ते तीन दिवसांत तापमानात क्रमाक्रमाने वाढ होण्याचे संकेत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com