Rupali Chakankar On Pranjal Khevalkar : प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे नग्न फोटो? रुपाली चाकणकरांची खळबळजनक माहिती
पुणे ड्रग्स शहरातील खराडी परिसरात उघडकीस आलेल्या ड्रग्स पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांवर गंभीर आरोप करण्यात आले असून राज्य महिला आयोगाने या प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या खेवलकर यांच्यासह चौघांवर कारवाई झाली असून, प्रकरणाचा तपास अधिक खोलवर सुरू आहे.
या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकरणातील गंभीर बाबींवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, आयोगाच्या सूचनेनंतर सानवी संस्थेकडून तपास अहवाल सादर करण्यात आला असून, तो अत्यंत धक्कादायक आणि भयावह आहे. या अहवालात मोबाइल फोन्सच्या हिडन फोल्डर्समधून तब्बल 252 व्हिडिओ आणि 1497 नग्न फोटो सापडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांनी याआधी खराडी येथील एका फ्लॅटवर छापा टाकून कोकेन, गांजा, हुक्का पॉट, 10 मोबाईल फोन आणि अन्य अमली पदार्थ जप्त केले होते. या फ्लॅटमध्ये ड्रग्स पार्टी सुरू असल्याचा आरोप होता. पुढील तपासादरम्यान, आरोपी प्रांजल खेवलकरच्या हडपसरमधील राहत्या घरातून काही मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या फोनमध्ये 'आरुष' नावाने सेव्ह असलेल्या नंबरवरून महिलांशी संपर्क साधण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासात समोर आले की, प्रांजल खेवलकर यांनी अनेक महिलांना ‘पिच्चरमध्ये काम देतो’ असं सांगून गोवा, लोणावळा, साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी बोलावले होते. तेथे त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार झाले असून, या संपूर्ण प्रकरणामागे मानवी तस्करीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे. काही पीडित महिलांनी आयोगाकडे थेट तक्रारी दाखल केल्या असून, आरोपींनी आर्थिक गरिबीचा फायदा घेत या महिलांना जाळ्यात ओढल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रकरणात पुढे आलेल्या माहितीनुसार, या महिलांना विवस्त्र करून नशेत असताना त्यांचे व्हिडिओ शूट करण्यात आले. त्यात काही मोलकरणींचेही अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळले आहेत. आरोपींकडून 28 वेळा रूम बुक करण्यात आल्याचे पुरावेही हाती लागले आहेत. या सगळ्या गोष्टींकडे पाहता, केवळ ड्रग्स पार्टीचा बहाणा करून मोठ्या प्रमाणावर अनैतिक शोषण आणि मानवी तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट होते.
प्रकरणात प्रांजल खेवलकर स्वतः काही व्हिडिओंमध्ये दिसून येत असून, हे फार मोठं रॅकेट आहे, हे लवकरच उघडकीस येईल, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि स्वतंत्र एसआयटी स्थापन करून व्यापक तपास करावा, यासाठी राज्य महिला आयोगाने सरकारकडे अधिकृत पत्राद्वारे मागणी केली आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तिव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आता तपास यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.