Sanjay Raut : “काँग्रेसपासून नाही, मोदी सरकारपासून देशाला धोका”, संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली. “काँग्रेसपासून देशाला धोका आहे असे म्हणणे म्हणजे निव्वळ बकवास आहे,” असे ठणकावून सांगत राऊत यांनी संसदीय परंपरा, देशाचा इतिहास आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर भूमिका मांडली.
राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी दिल्लीत येण्याआधीपासून आम्ही संसदेत आहोत. आम्हाला संसद आणि संसदेचे नियम काय आहेत, हे नीट माहिती आहे.” काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या बलिदानांचा उल्लेख करत ते म्हणाले की, “ज्या काँग्रेसने देशासाठी तुरुंगवास भोगला, स्वातंत्र्यलढ्यात सर्वात मोठे योगदान दिले, त्याच काँग्रेसपासून कोणाला धोका आहे असे म्हणणे हास्यास्पद आहे.”
पंतप्रधान मोदींवर थेट आरोप करत राऊत म्हणाले की, “गेल्या दहा वर्षांत देशाला खरा धोका मोदी सरकारपासून निर्माण झाला आहे.” काश्मीरपासून मणिपूरपर्यंत झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या काळात असंख्य लोकांचे प्राण गेले. “जर देश कोणाच्या गुलामगिरीकडे झुकत असेल, तर ती अमेरिकेची गुलामगिरी आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या मुद्द्यांवर भूमिका घ्यावी, अशी मागणी करत राऊत म्हणाले की, “याआधी भाजपनेही अनेक पंतप्रधानांच्या काळात संसदेत आंदोलन केले. तेव्हा कुणीही ‘आम्हाला खासदारांपासून धोका आहे’ असे म्हटले नव्हते.” त्यांनी सरकारला “डरपोक” संबोधत पंतप्रधानांवर टीका केली. “छप्पन इंचाची छाती कुठे गेली? खासदारांना घाबरणारे तुम्ही, पण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकता,” असा घणाघात त्यांनी केला.
एपिस्टीन फाईलचा उल्लेख करत राऊत यांनी दावा केला की, या प्रकरणात मोदी मंत्रिमंडळातील मंत्री हरदीप पुरी यांचे नाव समोर आले आहे. “एपिस्टीन आणि त्याच्या लोकांशी झालेला संवाद रेकॉर्डवर आहे. हे सर्व मोदींच्या संमतीशिवाय घडले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोदींच्या आसपास असलेल्या इतर लोकांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलताना राऊत म्हणाले की, रोहित पवार हे पवार कुटुंबातील महत्त्वाचे घटक आहेत. “ते जर काही नवी माहिती समोर आणणार असतील, तर महाराष्ट्र ती ऐकण्यास उत्सुक आहे,” असे ते म्हणाले. अजित पवारांच्या निधनानंतर आपण अस्वस्थ असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी सांगितले की, “आमचे दादांशी राजकीय मतभेद होते, पण आम्ही दादा प्रेमी आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणातलं उमदं नेतृत्व म्हणजे अजित दादा होते.”
शरद पवारांबद्दल बोलताना राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख स्तंभ आहेत. त्यांच्या समोर बाकी सगळे ज्युनिअर आहेत.” सत्तेत आल्यावर काही नेत्यांना “अकलेची शिंगं फुटतात,” असा टोला त्यांनी भाजपच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांना लगावला आणि पवार साहेबांच्या योगदानाची आठवण करून दिली.
