Donald Trump : "...तर आम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेवर घाव घालू" अमेरिकनची भारत, चीन, ब्राझीलला धमकी
अमेरिकेचे ज्येष्ठ रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी रशियन तेल आयात करणाऱ्या देशांवर जोरदार निशाणा साधला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीन, भारत आणि ब्राझीलसारख्या देशांना थेट इशारा दिला की, "रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी सुरूच राहिल्यास, आम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेवर घाव घालू".
ग्रॅहम यांच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या एकूण तेल निर्यातीपैकी सुमारे 80 टक्के हिस्सा या तीन देशांकडे जातो. "या व्यापारामुळे व्लादिमीर पुतिन यांच्या युद्धसत्राला अप्रत्यक्ष पाठबळ मिळतं," असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यांनी स्पष्ट केलं की ट्रम्प प्रशासन पुन्हा सत्तेवर आल्यानंतर या देशांवर आयात शुल्क लावण्याची शक्यता आहे. ग्रॅहम पुढे म्हणाले, "भारत, चीन व ब्राझीलने जर हेच धोरण कायम ठेवलं, तर त्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. स्वस्त तेलातून ते जी बचत करत आहेत, ती माणसांच्या रक्ताने माखलेली आहे."
अमेरिकन सिनेटमध्ये सध्या 500 टक्के आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे, जो रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांना लक्ष्य करतो. यावरून ट्रम्प यांचं प्रशासन युद्धकाळातील निधी आणि परराष्ट्र व्यापार धोरणात अधिक आक्रमक वाटचाल करणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. ट्रम्प यांनी पुतिन यांना युक्रेनमधील कारवाई थांबवण्यासाठी 50 दिवसांचा अल्टीमेटम दिला असून, त्यानंतर कठोर आर्थिक निर्बंध लावले जातील, असा अमेरिकन प्रशासनाचा इशारा आहे.या पार्श्वभूमीवर, भारतासारख्या देशांसाठी परराष्ट्र धोरणात नव्या आव्हानांची शक्यता निर्माण झाली आहे.