Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य
राज्य सरकारने अखेर हिंदी सक्तीविरोधातील जीआर (शासन निर्णय) मागे घेतला असून, यामुळे मराठी भाषिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या संयुक्त मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या 5 जुलै रोजी मुंबईत होणारा मोर्चा आता रद्द करण्यात आला असून, हा दिवस "मराठी विजय दिन" म्हणून साजरा केला जाणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे हिंदी सक्तीविरोधात आवाज उठवत 5 जुलै रोजी मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, सरकारने जीआर रद्द केल्यानंतर हा मोर्चा साजरा न होता आता विजय दिनाच्या सोहळ्यात रूपांतरित झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत ही महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, "हा दिवस महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक आहे. अनेक वर्षांनी मराठी भाषिकांना ही मोठी मोहीम यशस्वी होताना पाहायला मिळतेय."
5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वरळीतील डोम सभागृहात 'मराठी विजय दिन' सोहळा पार पडणार आहे. राज्यभरातून शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांनी सूचक शब्दात सांगितले की, "उद्या काय ठरलंय आणि पुढे काय ठरणार आहे, हे तुम्हाला कळेल."