Ladki Bahin Yojana : महिला लाभार्थींना दिलासा, ऑगस्ट हप्त्याचा निधी अंतिम टप्प्यात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. सामाजिक न्याय विभागानं यासंदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 9 सप्टेंबर रोजी जारी केला असून, या निर्णयानुसार 344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
महायुती सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात, तर पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांना दरमहा 500 रुपये दिले जातात. योजनेच्या अंमलबजावणीनंतर आतापर्यंत 13 हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून निधी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केला जातो. त्याप्रमाणेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागानं 344.30 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्य सरकार किंवा महिला व बाल विकास विभाग ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, योजनेचा लाभ योग्य पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे राज्यातील तब्बल 26 लाख महिलांची गृहचौकशी केली जाणार आहे. एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेण्याची परवानगी आहे. मात्र, तीन महिला लाभ घेत असल्याचे आढळल्यास अशा कुटुंबातील एका महिलेचा लाभ बंद करण्यात येणार आहे.
ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा निधी उपलब्ध झाल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थी महिलांना आता दिलासा मिळणार आहे.