Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update

Weather Update : राज्यात हवामानाचा खेळखंडोबा; कधी थंडी, कधी उकाडा तर पावसाचीही शक्यता

हवामानात मोठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळत आहेत. कधी कडाक्याची थंडी, कधी ढगाळ वातावरण, तर कधी अचानक उकाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळत आहेत. कधी कडाक्याची थंडी, कधी ढगाळ वातावरण, तर कधी अचानक उकाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये थंडीचा प्रभाव जाणवू लागला. मात्र, जानेवारी महिन्यात तापमानात सातत्याने बदल होत असल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत.

हवामान खात्याने सुरुवातीला सांगितले होते की, डिसेंबरप्रमाणेच जानेवारीतही राज्यात थंडी कायम राहील. मात्र, जानेवारी संपत आला असतानाही राज्यात अपेक्षित थंडी जाणवत नसून तापमानात मोठे चढउतार दिसून येत आहेत. विशेष म्हणजे देशाच्या उत्तरेकडील भागांत कडाक्याची थंडी जाणवत असताना महाराष्ट्रात मात्र त्या तुलनेत सौम्य थंडी किंवा उकाड्याची स्थिती आहे. साधारणपणे उत्तर भारतात थंडी वाढली की त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसतो. पण यंदा हे चित्र काहीसे वेगळे असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

दरम्यान, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला असून तिथे कडाक्याची थंडीही अनुभवायला मिळत आहे. त्याच्या तुलनेत महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत असल्याचे दिसून येत आहे. कधी सकाळी गारवा, दुपारी उकाडा, तर संध्याकाळी ढगाळ वातावरण अशी स्थिती अनेक भागांत आहे.

सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली असून येथे किमान तापमान ८.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. आजही धुळ्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला तसेच अंगदुखीचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, उबदार कपडे वापरावेत आणि अचानक होणाऱ्या बदलांना तोंड देण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com