Mumbai -Goa Highway : मुंबई–गोवा महामार्गाची नवी डेडलाईन; मार्च २०२६ पर्यंत पूर्णत्वाचा दावा
मुंबई–गोवा महामार्गाचे काम तब्बल १४ वर्षांपासून रखडलेले असून अखेर राज्य सरकारने या प्रकल्पासाठी नवी अंतिम मुदत जाहीर केली आहे. ४३४ किमी लांबीच्या या महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
पनवेल–इंदापूरचा अडथळा
महामार्गाचे सर्वाधिक रखडलेले काम पनवेल–इंदापूरदरम्यान आहे. या ८४ किमी लांबीच्या भागात उड्डाणपूल, बायपास पुनर्बाधणी आणि कंत्राटदारांच्या विलंबामुळे काम थांबले होते. त्यामुळे पूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही.
महामार्गाचे स्वरूप
कोकण एक्स्प्रेस किंवा राष्ट्रीय महामार्ग ६६ म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता पळस्पे (पनवेल) ते झाराप (महाराष्ट्र–गोवा सीमा) पर्यंत जाणार आहे. २०११ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे उद्दीष्ट विद्यमान दोन लेनचा रस्ता चार लेन एक्स्प्रेसवेमध्ये बदलणे हे होते. या कामामुळे मुंबई–गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १२ तासांवरून फक्त सहा तासांवर येईल, असा दावा करण्यात आला होता.
दशकभर त्रासलेल्या प्रवाशांचा प्रश्न
गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना खराब दर्जा, खड्डेमय रस्ते आणि वळणांमुळे मोठा त्रास सहन करावा लागला आहे. काम रखडल्यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनाही प्रवासात अडचणी येत आहेत.
१० पॅकेजमध्ये विभागलेले काम
या महामार्गाचे बांधकाम १० पॅकेजसमध्ये विभागले आहे. त्यातील पनवेल–इंदापूरदरम्यानची दोन पॅकेजेस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहेत. तर उर्वरित आठ पॅकेजेस राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे पूर्ण केली जात आहेत.
उड्डाणपूल रखडलेले
वडखळ–महाड दरम्यानचे सहा उड्डाणपूल वर्षानुवर्षे अपूर्ण राहिले आहेत. यासाठी आता नव्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून काही कामे सप्टेंबर २०२५ पर्यंत आणि उर्वरित कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
१४ वर्षांपासून तारीख पे तारीख देऊन रखडलेल्या या प्रकल्पाबाबत आता मार्च २०२६ ही नवी डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. मात्र या वेळीही दिलेल्या वेळेत काम पूर्ण होईल का, याकडे कोकणवासीय आणि प्रवासी यांचे लक्ष लागलेले आहे.