जगातील टॉप ५०० अब्जाधीशांनी एका दिवसांत गमावले २०८ अब्ज डॉलर; सर्वाधिक फटका मार्क झुकेरबर्गला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १८० देशांवर टॅरिफ लागू केले. त्याचा परिणाम जगभरातील अब्जाधीशांवरदेखील झाला आहे. टॅरिफ जाहीर झाल्यानंतर, सर्वात जास्त प्रभावित होणारे अब्जाधीश अमेरिकेतील होते. टॅरिफमुळे जगभरातील ५०० अब्जाधीशांनी एका दिवसातच सुमारे २०८ अब्ज डॉलर गमावले आहेत. या ५०० अब्जाधीशांनी गमावलेली ही एकत्रित रक्कम आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प टॅरिफचा सर्वाधिक फटका फेसबुक म्हणजेच मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना बसला आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये १७.९ अब्ज डॉलरने घट झाली आहे. म्हणजेच त्यांची एकूण ९ टक्के संपत्ती कमी झाली आहे. ब्लूमबर्गच्या बिलियनेअर्स इंडेक्सच्या १३ वर्षांच्या इहितासातील ही चौथी मोठी घट ठरली असून कोरोना महामारीपासूनची सर्वात मोठी घट आहे.
टेस्ला, ॲमेझॉनचे शेअर घसरले
डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र आणि सरकारी सल्लागार तसेच स्पेसएक्स-टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी ११ अब्ज डॉलर गमावले आहेत. कारण टॅरिफमुळे टेस्लाच्या शेअर्समध्ये ५.५टक्क्यांची घट झाली. टॅरिफमुळे प्रभावित झालेल्या इतर अब्जाधीशांमध्ये ॲमेझॉनचे जेफ बेझोसही आहेत. त्यांच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांची घट झाली. अमेझॉन कंपनीने एप्रिल २०२२ पासून पाहिलेली ही सर्वात मोठी घट आहे. त्यामुळे त्यांना १५.९ अब्ज डॉलर गमावले आहेत.
संपत्तीत घट झालेले इतर अब्जाधीश असे
ज्यांच्या संपत्तीत घट झाली अशा अन्य अमेरिकन अब्जाधीशांमध्ये मायकेल डेल (९.५३ अब्ज डॉलर), लॅरी एलिसन (८.१ अब्ज डॉलर), जेनसन हुआंग (७.३६अब्ज डॉलर), लॅरी पेज (४.७९ अब्ज डॉलर), सर्गेई ब्रिन (४.४६ अब्ज डॉलर) आणि थॉमस पीटरफी (४.०६ अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे.