Mahadevi Elephant : "महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाही" पेटाचे नवे निवेदन, महादेवी हत्तीणीची घरवापसी पुन्हा अडचणीत
नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी’ हत्तीणीच्या (माधुरी) पुनर्वसनाच्या हालचालींमध्ये प्राणी संरक्षण संस्था पेटा इंडियाने नव्या पत्रातून आणखी एक अडथळा उभा केला आहे. महाराष्ट्रात वन्य हत्तींच्या उपचार व पुनर्वसनासाठी आवश्यक दर्जाच्या सुविधा नाहीत, हे स्पष्ट करत त्यांनी महादेवीला पुन्हा नांदणीत नेऊन साखळदंडात ठेवणं अमानवीय ठरेल, असा ठाम दावा केला. त्यामुळे आधीच गुंतागुंतीचे झालेले हे प्रकरण पुन्हा विलंबित होण्याची शक्यता वाढली आहे.
सोशल मीडियावरून पेटाची भूमिका
पेटा इंडियाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत महादेवी सध्या गुजरातमधील ‘वनतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात योग्य वातावरणात असल्याचं सांगितलं. तिची पुन्हा साखळदंडात बांधणी ही चुकीची ठरेल, असा त्यांचा इशारा असून, महाराष्ट्रात वनताराच्या तोडीच्या सुविधा नसल्याने तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.
सरकारचे प्रयत्न आणि केंद्राची ग्वाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महादेवीच्या घरवापसीसाठी प्रयत्नशील असताना, ७ ऑगस्ट रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात महादेवीला नांदणीत आणण्यासाठी केंद्राकडून आवश्यक सहकार्य मिळेल, अशी हमी शहा यांनी दिली. दरम्यान, मुंबईत वनतारा, नांदणी मठ आणि राज्य सरकारचे वकील यांच्यात चर्चा सुरू आहे, मात्र पेटाच्या ताज्या भूमिकेमुळे या चर्चांना वेगळं वळण मिळू शकतं.
आरोग्य स्थिती आणि न्यायालयीन आदेश
पेटाने १६ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला पाठिंबा दर्शवला आहे. या आदेशात महादेवीच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास सांगण्यात आलं होतं. त्यांच्या मते, ती ग्रेड-४ अर्थरायटिस, ‘फूट रॉट’सारख्या पायांच्या आजाराने त्रस्त असून, डोकं हलवण्यासारखी मानसिक लक्षणंही दिसतात. सलग ३३ वर्षे ती एकटी, साखळदंडात आणि काँक्रीटच्या पृष्ठभागावर असल्याने तिच्या यातना वाढल्या आहेत. न्यायालयाने तिला इतर हत्तींच्या संगतीत, मोकळ्या वातावरणात आणि सुरक्षित निवृत्तीचा अधिकार मान्य केला आहे.
भट्टारकांच्या मृत्यूचा संदर्भ
पेटाच्या म्हणण्यानुसार, मानसिक तणावामुळे हत्ती काहीवेळा आक्रमक होऊ शकतात. महादेवीनेही पूर्वी नांदणी मठातील भट्टारकांचा जीव घेतला होता. त्यामुळे तिच्या पुनर्वसनासाठी शांत परिसर, मुबलक पाणी, तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि इतर हत्तींची सोबत अत्यंत महत्त्वाची आहे.
पर्यायी पुनर्वसनाचे पर्याय
पेटाच्या मते, महाराष्ट्रात योग्य सुविधा नसल्याने महादेवीला वनतारा (गुजरात) येथेच ठेवणं हितावह ठरेल. तसेच उत्तर प्रदेशातील ‘Wildlife SOS’ किंवा कर्नाटकमधील ‘Wildlife Rescue and Rehabilitation Centre’ येथे तिला सुरक्षित व आरोग्यपूर्ण निवृत्ती मिळू शकते, तर त्या ठिकाणी पाठवण्यासही ते तयार आहेत.
पुनर्वसन हाच एकमेव उद्देश
“महादेवीला शांत, सुरक्षित आणि तिच्या शारीरिक-मानसिक पुनर्वसनासाठी अनुकूल जागा मिळवून देणं हा आमचा एकमेव हेतू आहे,” असं पेटाने स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयानेही हे सुनिश्चित केल्याचं त्यांनी नमूद केलं असून, प्रकरण पुन्हा न्यायालयात गेल्यास योग्य निर्णय होईल, असा त्यांचा विश्वास आहे.