Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या
दसरा, दिवाळी आणि धनत्रयोदशी या सणासुदीच्या दिवसांत सोन्या–चांदीच्या खरेदीला मोठं महत्त्व असतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी दरामुळे सामान्य ग्राहक दागिने खरेदीपासून दूर गेले होते. आता मात्र दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. येत्या काळात सोने–चांदीच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या एका वर्षात सोन्याचा दर तब्बल 46 टक्क्यांनी वाढला होता. केवळ याच वर्षात 40 टक्क्यांची झेप घेत सोन्याचा दर 75 हजारांवरून थेट 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत गेला. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचा दर घसरताना दिसतो आहे. गुरुवारी 24 कॅरेट सोनं 500 रुपयांनी कमी झालं असून, मंगळवारच्या तुलनेत एकूण 1600 रुपयांची घसरण झाली आहे.
सोन्यासोबतच चांदीही स्वस्त झाली आहे. 16 सप्टेंबर रोजी प्रति किलो दर 1,29,300 रुपये होता, जो गुरुवारी घसरून 1,25,563 रुपयांवर आला. म्हणजेच फक्त दोन दिवसांत चांदी तब्बल 3,500 रुपयांनी कमी झाली आहे.
या घसरणीमागे जागतिक कारणं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्याचा परिणाम थेट सोन्या–चांदीच्या दरांवर झाला आहे. भविष्यातही अशीच व्याजदर कपात सुरू राहिल्यास भाव आणखी कमी होऊ शकतात. काही तज्ज्ञांच्या मते सोने आणि चांदीच्या दरात सुमारे 10 टक्के घट होण्याची शक्यता असून, सोने प्रति 10 ग्रॅम एक लाख रुपयांच्या आसपास मिळू शकेल. यामुळे सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.