Devendra Fadnavis : 'राज–उद्धव युतीला अर्थ नाही'; फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी थेट भविष्यवाणी करत, “राज ठाकरे फक्त पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील,” असे म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले की, “आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, पण याला आता काहीच अर्थ उरलेला नाही. जर 2009 साली शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते, तर आजची राजकीय परिस्थिती वेगळी असती. त्या काळात त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला असता. मात्र आता त्यांच्या हातातून मतदार निसटले आहेत.” या युतीचा राज ठाकरेंना काहीही फायदा होणार नसल्याचा दावा करत, “राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थोडाफार फायदा होईल, पण उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना कोणताही फायदा होणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
याच मुलाखतीत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. “जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, पण विचारांचा वारसा मिळत नाही. यांना विचारांचा वारसा मिळालेला नाही,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केला आहे. “आम्ही सातत्याने सांगत आहोत की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. भाजप म्हणते की मुंबईचा महापौर हिंदू होईल. म्हणजे भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसांवर गोळ्या झाडणारा मोरारजी देसाई हिंदू होता की नव्हता?” असा थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या पराभवाची भविष्यवाणी केल्याने राजकीय वाद पेटला आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सुरू झालेली ही शाब्दिक लढाई येत्या काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
