Pune Weather Today

Pune Weather Today : पुण्याला अवकाळीने झोडपले, विमानतळ परिसर जलमय

अवकाळी पावसाने पुण्याला झोडपले, विमानतळ परिसर जलमय, जनजीवन विस्कळीत.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुण्यात आज दुपारी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली. विशेषतः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. सुमारे तासभर जोरदार कोसळलेल्या पावसामुळे विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील परिसरात चेंबर भरून वाहू लागले होते. ड्रेनेज सिस्टम अकार्यक्षम ठरल्यामुळे पाणी रस्त्यावर पसरले आणि प्रवाशांना त्यातून वाट काढत जावे लागले.

अवघ्या एका तासात विमानतळ परिसरात पाण्याचा निचरा न होणे ही बाब विशेष लक्षवेधी ठरली, कारण काही महिन्यांपूर्वीच नव्या टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे या नवीन सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरातील धानोरी परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्येही पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. पाणी उपसण्यासाठी रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

स्वारगेट, फातिमानगर, हडपसर आणि शिवाजीनगरसह अनेक भागांत पावसाने धडक दिली. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्ते तुंबले, वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. राज्यभरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ही परिस्थिती नागरिकांच्या अडचणी वाढवणारी ठरली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com