हिंगोली जिल्ह्यातील हे गावच ग्रामस्थांनी काढल विक्रीला
गजानन वाणी, हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात या हंगामात अनेकदा अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेती व्यवसायावर अवलंबून असलेले शेतकरी वर्गाचे बेहाल झाले आहेत, किती ही ओरडून कुणीच दखल घेत नसल्याने हिंगोली तालुक्यातील गारखेडा गाव गावकऱ्यानीं विक्रीला काढल आहे.
अतिवृष्टीत नुकसान झालं पण अद्याप मदत मिळाली नाही, त्यात महावितरणने अनेकांची वीज कापली, गावाला पीकविमा मिळत नाही. त्यामुळे गावकऱ्यानीं हा निर्णय घेतला आहे. वीजपुरवठा तात्काळ सुरू करा, सरसगट शेतकऱ्यानां पीक विमा द्या, खाजगी फायनान्सचे कर्ज माफ करा, हिंगोली जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करा. अश्या आशयाचे बॅनरच गारखेडा वाशीयांनी गावात लावले आहे. वेळीच मागण्या न मान्य झाल्यास संपूर्ण गाव शेतजमिनी, गुरे, ढुरे सहित विक्री करणार असल्याच ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे.
जोपर्यंत गावचे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय, गावातील शाळा बंद ठेवण्यात येणार असून प्रत्येक निवडणूकीत मतदान बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. वीज बिल थकबाकीमुळे गाव परिसरातील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. गत दोन ते अडीच महिन्यांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे. यामुळे संतप्त गावकऱ्यानीं विविध मागण्यांसाठी चक्क गावच विक्रीला काढत इच्छा मरणाची मागणी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावाने असलेले निवेदन गोरेगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.