विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. यंदा तापमानाने स्वतःचा मागील वर्षाचा रेकॉर्ड तोडून नवीन उच्चांक गाठला आहे. यंदा चंद्रपूरने यात बाजी मारुन पहिला क्रमांक पटकवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भाला तीव्र उन्हाचा तडाखा बसतो आहे. त्यातच विदर्भातल्या शहरांची देशातील इतर उष्ण शहरांबरोबर जणू स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे विदर्भ देशातील सर्वाधिक उष्ण प्रदेश झाला आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर या शहराचे नाव तापमानाच्या बाबतीत जागतिक क्रमवारीमध्ये पहिले आले होते . तापमानाचा पारा ४५ अंशावर पोहोचला आहे .विदर्भात उष्णतेची लहर घोषित करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहणार असून दोन्ही दिवस अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर येथे उष्णतेची लहर राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ५ काही महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेचा तडाखा इतका आहे की त्यामुळे नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र परत एकदा राज्यात आणि विशेषतः विदर्भात उष्णता वाढली असून नागरिकांनी काळजी घेण्याचं सांगण्यात येत आहे.