Nitin Gadkari : यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जाहीर
यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार असून राष्ट्रनिर्मितीच्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 1983 पासून सुरु करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे 2025 चे यंदाचे मानकरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने हा पुरस्कार त्यांना दिला जाणार असून हा सोहळा 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30वाजता टिळक स्मारक मंदिरात संपन्न होणार आहे.
याबाबतची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. नितीन गडकरी नेहमी आपल्या विचारांमधून आणि कृतींमधून वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार करत असतात. देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन यंदाचा हा मान नितीन गडकरी यांना देण्यात आल्याचे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टने स्पष्ट केले.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार असून टिळक महाविद्यालयाच्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, टिळक महाविद्यालय ट्रस्टच्या आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक हे सुद्धा येणार आहेत. 1983 साली सुरुवात झालेल्या या पुरस्काराचे पहिले मानकरी एस.एम. जोशी हे होते. आतापर्यत अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळाला असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, नारायण मूर्ती, राहुलकुमार बजाज यांचा सुद्धा समावेश आहे.