Sangli News : सांगलीत 'त्या' फोटोची सर्वत्र चर्चा, पृथ्वीराज पाटील एकाच व्यासपीठावर, राजकीय चर्चांना उधाण
सांगली जिल्ह्यातील बुधगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगलीच्या राजकारणातील तीन दिग्गज पाटील एकत्र आले आणि त्यांच्या गप्पांचा फड रंगल्याने चर्चांना उधाण आले आहे.आजी खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील आणि नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले पृथ्वीराज पाटील हे तिघेही एकाच व्यासपीठावर दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी ते तिघे एकमेकांशी आनंदाने संवाद साधताना दिसले. लोकसभेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे हे प्रतिस्पर्धी एका व्यासपीठावर मैत्रीपूर्ण वातावरणात गप्पा मारताना दिसल्याने उपस्थितांची विशेष उत्सुकता चाळवली.
या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंग होता, बुधगाव ग्रामपंचायतीतर्फे आणि लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीच्या लोकार्पणाचा. सन 1998 मध्ये आसाममध्ये बोडो अतिरेक्यांविरुद्ध शौर्याने लढून वीरमरण पत्करलेल्या बुधगावचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल प्रकाश बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही कमान उभारण्यात आली आहे.
या लोकार्पण सोहळ्यात तिन्ही पाटलांचे एकत्र व्यासपीठावर बसणे आणि गप्पांचा माहोल रंगवणे हे सांगलीच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांच्या अशा अनपेक्षित मैत्रीपूर्ण भेटीमुळे स्थानिक राजकारणात पुढे काय घडामोडी घडतील याबाबतही चर्चांना उधाण आले आहे.