Mulund : मुलुंडमध्ये 'डिजिटल अरेस्ट'चा थरार; निवृत्त बँक मॅनेजरला १.८३ कोटींचा गंडा

Mulund : मुलुंडमध्ये 'डिजिटल अरेस्ट'चा थरार; निवृत्त बँक मॅनेजरला १.८३ कोटींचा गंडा

मुलुंड, सायबर गुन्हेगारांनी रचलेल्या 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात अडकून मुलुंडमधील एका निवृत्त बँक मॅनेजरला तब्बल १ कोटी ८३ लाख ४० हजार रुपयांचा फटका बसला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुलुंड, सायबर गुन्हेगारांनी रचलेल्या 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात अडकून मुलुंडमधील एका निवृत्त बँक मॅनेजरला तब्बल १ कोटी ८३ लाख ४० हजार रुपयांचा फटका बसला आहे. तब्बल ३५ दिवस या कुटुंबाला मानसिक धाकाखाली घरातच कैद करून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई सायबर सेलने गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

मुलुंड पूर्व भागात राहणारे अशोक महादेव साळवी (६२) हे केनरा बँकेतून व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले आहेत. ७ जानेवारी २०२६ रोजी त्यांना एका अज्ञात महिलेचा फोन आला. "तुमच्या नावावर एक बनावट सिम कार्ड असून त्यावरून घाटकोपर परिसरात बेकायदेशीर मेसेज पाठवले जात आहेत, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे," असे तिने साळवी यांना सांगितले.

हा कॉल पुढे कथित क्राईम ब्रांच आणि नंतर सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला. तोतया आयपीएस अधिकारी 'जयप्रभाकर चौगुले' याने साळवी यांना घाबरवून सांगितले की, तुमचा आधार क्रमांक गुन्हेगारी यादीत असून तुमचे नाव मनी लाँड्रिंगमध्ये आले आहे. विश्वास संपादन करण्यासाठी ठगांनी सर्वोच्च न्यायालय आणि ईडीचे लोगो असलेले बनावट दस्तऐवज व्हॉट्सॲपवर पाठवले.

तपास अत्यंत गोपनीय असल्याचे सांगून ठगांनी साळवी कुटुंबियांना बाहेर कोणाशीही बोलण्यास सक्त मनाई केली. "कोणाला काही सांगितले तर तात्काळ अटक करू," अशी धमकी देण्यात आली. साळवी, त्यांची पत्नी आणि मुलीला एकाच खोलीत बसवून दर दोन तासांनी रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले. नजर ठेवण्यासाठी पत्नीचा मोबाईल २४ तास व्हिडिओ कॉलवर सुरू ठेवला जात होता.

१४ ते ३१ जानेवारी दरम्यान, अटकेची भीती दाखवून ठगांनी साळवी यांना विविध बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. या मानसिक दबावाखाली साळवी यांनी बँकेतील मुदत ठेवी (FD) मोडल्या, घरातील सोने गहाण ठेवले, गुंतवणूक केलेले शेअर्स विकले.

११ फेब्रुवारी रोजी अचानक सर्व संपर्क तुटला आणि ठगांचे फोन बंद झाले. संशय आल्याने साळवी यांनी चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. १८ फेब्रुवारी रोजी त्यांनी '१९३०' या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली, पोलिसांनी संबंधित बँक खात्यांची माहिती गोळा करून तपास सुरू केला असून पुढील कारवाई सुरू आहे. सीबीआय, पोलीस किंवा ईडी कधीही व्हिडिओ कॉलवर कोणाला 'अरेस्ट' करत नाही किंवा पैसे मागत नाही. अशा फोनला घाबरू नका आणि तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधा असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

-राजेश गुप्ता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com