Weather Update : हिवाळ्यात पावसाळा! नोव्हेंबरच्या पुढील तारखांदरम्यान वादळी पावसाचा इशारा
देशभरातील हवामान अचानक बदलल्याचे चित्र दिसत आहे. काही राज्यांत हिवाळ्याची चाहूल लागली असतानाच, काही ठिकाणी अजूनही पावसाचे सावट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस देशातील हवामानात मोठे चढ-उतार दिसणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ आणि मध्य भारतातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर समुद्रसपाटीपासून सुमारे 1.6 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे कायम आहेत. यामुळे वातावरणात आर्द्रता वाढली असून, काही भागात ढगाळ हवामान आणि अधूनमधून पावसाच्या सरींची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील नाशिक, महाबळेश्वर, निफाड आणि वाशिम परिसरात तापमानाचा पारा 14 अंश सेल्सियसपर्यंत घसरला आहे. त्यामुळे गारठा जाणवू लागला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, हेच वातावरण आणखी दोन ते तीन दिवस कायम राहिल्यास तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार
9 ते 12 नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडूच्या बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 9 नोव्हेंबरला केरळ राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी येतील. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये 9 आणि 10 नोव्हेंबरला थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पूर्व राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांत तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात वातावरण कसे आहे?
मुंबईत तापमानात घट झाली असून थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. त्याचसोबत नाशिकमध्ये 13.4, सांगलीत 18, जळगावमध्ये 10, बीडमध्ये 13.5, परभणीमध्ये 14.4 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आगामी आठवड्यात थंडीचा जोर वाढेल असा इशारा हवामान विभागाने इशारा दिला आहे.
यंदा दिवाळीनंतर लगेचच थंडीचा अनुभव येण्याऐवजी, अनेक ठिकाणी पावसाने पुनः हजेरी लावली आहे. साधारणतः या काळात हवेत कोरडेपणा आणि गारवा असतो, मात्र यंदा परिस्थिती उलट झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला होता. तज्ज्ञांच्या मते, हवामानातील या अनिश्चित बदलामागे बंगालच्या उपसागरातील चक्रीय वारे आणि दक्षिणेकडील ओलाव्याचे प्रवाह हे मुख्य कारण आहे.
देशातून अजूनही पावसाचे ढग पूर्णपणे नाहीसे झालेले नाहीत, त्यामुळे काही राज्यांत पावसाचा धोका कायम आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला असून, पुढील 48 तास धोकादायक हवामान स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि किनारपट्टी भागातील नागरिकांनी हवामान खात्याच्या अद्ययावत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे

