IndiGo flight : अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द, इंडिगो विमान सेवेचा आमदारांना पण फटका
महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राज्याच्या राजकीय व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. (IndiGo flight) इंडिगोच्या सतत चालू असलेल्या विमान सेवा गोंधळाचा परिणाम आता थेट विधिमंडळाच्या कामकाजावर होऊ लागला आहे. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या डझनभर आमदारांची तिकिटं रद्द झाली असून, अनेकांना अचानक प्रवासाचे पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत.
विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई विभागातील अनेक महत्त्वाच्या आमदारांची दुपारच्या फ्लाईटची तिकिटं रद्द झाली. अनेकांनी कुटुंबीयांसह नागपूर गाठण्याची तयारी केली होती, मात्र विमान सेवा ठप्प झाल्याने आमदार महामार्गावरून स्वतःच्या मोटारींनी नागपूरकडे धावत असल्याची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई या प्रमुख विमानतळांवरील भीषण गर्दी, रद्द फ्लाईट्स आणि उशीर यामुळे सामान्य प्रवाशांसह आमदारही अक्षरशः हैराण झाले आहेत. इंडिगोच्या गोंधळामुळे मागील चार दिवसांत 2,000 हून अधिक फ्लाईट्स रद्द झाल्या असून एकूण 3 लाखांहून अधिक प्रवासी, त्यात मंत्री–आमदारही, अडचणीत आले आहेत.
उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला ही गडबड मोठा फटका बसू शकते. अधिवेशनातील महत्त्वाचे विधेयक, चर्चा आणि मंत्रिमंडळाची उपस्थिती यावरही या तांत्रिक गोंधळाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
