31st party : ३१ डिसेंबरला कडक बंदोबस्त! पुणे–मुंबईसह देशातील महत्त्वाच्या शहरांत पोलीस तैनात
सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज झाला असतानाच, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, नाशिकसह देशातील प्रमुख शहरांमध्ये पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायी नववर्ष साजरे करता यावे, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
मुंबईत दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, वांद्रे बँडस्टँड यांसारख्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांमुळे या भागांत प्रचंड गर्दी होत असल्याने कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी शहर आणि उपनगरांमध्ये सुमारे १७ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले असून, त्यामध्ये राज्य राखीव पोलीस दल (SRPF), क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) आणि महिला पोलीस पथकांचा समावेश आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीसही तैनात असणार असून, छेडछाड किंवा गैरप्रकार करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल. शहरभर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुख्य नियंत्रण कक्षातून सतत नजर ठेवली जाणार आहे.
पुणे, नाशिक आणि इतर मोठ्या शहरांमध्येही प्रमुख चौक, बाजारपेठा, हॉटेल परिसर आणि सेलिब्रेशन पॉईंट्सवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी, स्टंटबाजी किंवा गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईत मरिन ड्राईव्ह आणि गेटवे ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या काही रस्त्यांवर वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध असतील, तर काही रस्ते वन-वे आणि नो-पार्किंग करण्यात आले आहेत. पश्चिम उपनगरांमध्ये जुहू आणि वांद्रे परिसरात सायंकाळनंतर वाहतूक वळवण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ विरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवण्यात येणार असून, ठिकठिकाणी नाकाबंदी करून ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाईल. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ १०० किंवा ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्साहात पण नियमांचे पालन करत सुरक्षितपणे नववर्षाचे स्वागत करा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
