Ambadas Danve: शेतकऱ्यांसाठी ठाकरे गटाचं आंदोलन, ट्रॅक्टर चालवत अंबादास दानवे सरकारवर बरसले
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला. मुसळधार पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान, कर्जमाफी, नुकसानभरपाई आदी प्रश्नांची दखल न घेतल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. या मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जे स्वतः ट्रॅक्टर चालवत मोर्चात सहभागी झाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी "क्या हुवा तेरा वादा?" असा सवाल करणारे फलक हातात घेतल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपासून मोर्चास सुरुवात झाली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली.
शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत दानवे म्हणाले, “कर्जमाफी, १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान, बहिणींसाठी २१०० रुपये, खताच्या किमती नियंत्रित करणं, हमीभाव... हे सगळं जाहीरनाम्याचं भाग होतं. पण सरकार सत्तेत आल्यानंतर या वचनांचा विसर पडलाय.” दानवे यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटलं, “जर लाडक्या बहिणीसाठी ४६ हजार कोटी निधी दिला जाऊ शकतो, तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३० ते ३२ हजार कोटी का दिले जात नाहीत?” त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या निधीची कपात, तसेच इतर खात्यांवर अन्याय होत असल्याची टीकाही केली.
तीन नेत्यांचे कार्टूनही ठळकपणे:
मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी तीन सत्ताधारी नेत्यांची कार्टून चित्रं दाखवून ‘क्या हुवा तेरा वादा’ असा सवाल उभा केला. दानवे म्हणाले, “हेच लोक शेतकऱ्यांना वचन देणारे होते, पण आता तेच वचन विसरले आहेत.” हा मोर्चा म्हणजे निवडणुकपूर्वी दिलेल्या वचनांची आठवण करून देण्याचा प्रयत्न असून, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आता लढा उभारला जाईल, असा स्पष्ट इशारा ठाकरे गटाने दिला आहे. अंबादास दानवे यांनी जाहीर केलं की, “शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल.”