Winter Session 2025 : हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; विरोधक विविध प्रश्नांवर आक्रमक
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला शेतकरी, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचारांसह विविध मुद्यांवर विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी अंतिम आठवड्यातील ठरावाद्वारे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सतेज पाटील म्हणाले की, हा शेतकऱ्यांबाबतचा एक महत्त्वाचा ठराव आहे आणि सभागृहात सर्व मंत्र्यांची अनुपस्थिती सरकार किती गंभीर आहे, हे दर्शविते. पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विधानसभेत राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे असल्याचा घणाघात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालकांवरील वाढते अत्याचार तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला. विधान परिषदेत सतेज पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, हे सरकार उद्योगपतींसाठी १६०० कोटी रुपये माफ करते आणि अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी १०-१५ हजार कोटी रुपयांची मागणी असूनही, फक्त ६०० कोटी रुपयेच देते. अतिवृष्टीमुळे ८.४ दशलक्ष हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सरकारने ३१,००० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले, परंतु आजही मोठ्या संख्येने शेतकरी मदतीपासून वंचित असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, विधानसभेत वडेट्टीवार म्हणाले, दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत. अतिवृष्टीने राज्यातील २८ जिल्ह्यांना फटका बसला. सरकारने ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. परंतु हे पॅकेज कागदावर राहिले.
भ्रष्टाचारावरून परब यांचा संताप
विधान परिषदेत शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब म्हणाले की, प्रशासन किंवा हे सरकार ऐकत नाही. नगरविकास विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शेतीच्या वापरासाठी एका संस्थेला दिलेली जमीन ४ कोटीत एका बिल्डरला कशी विकली, हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस सरकारच्या काळात विदर्भाची थट्टा
भाजपचे संजय कुंटे यांनी भाजपचे सरकार आल्यावर विदर्भात खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाल्याचे सांगितले. काँग्रेस सरकारच्या काळात विदर्भाची थट्टाच केली गेली. कोकणाप्रमाणेच विदर्भातही पर्यटन व नैसर्गिक संसाधने मोठ्या प्रमाणात असल्याकडे लक्ष वेधले. ठाकरे गटाचे सुनील प्रभू म्हणाले, सरकारने केवळ विकासाचा भास निर्माण केला. अंमली पदार्थाचे मोठे रॅकेट तयार झाले. विक्री करणाऱ्यावर मोक्का लावण्याचा निर्णय असूनही त्यावर नियंत्रण करता येत नसल्याचा आरोप प्रभू यांनी केला.
