Maharashtra Toll collection : राज्यातील जनतेने दिला 21 हजार कोटींचा टोल; गेल्या पाच वर्षांत 2 लाख 20 हजार कोटींची टोल वसुली
देशातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षामागे पाचशे ते हजार कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाच म्हणजे टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे.
राष्ट्रीय महामार्ग बांधण्यावर आलेला खर्च वसूल झाल्यानंतर टोल टॅक्स घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यानंतरही टोल टॅक्स वसुलीची रक्कम दरवर्षी पाचशे ते हजार कोटींनी वाढत आहे. 2020-21 ते 2024-25 (फेब्रुवारी 25 पर्यंत) या मागील पाच वर्षांत देशात 2 लाख 20 हजार 590 कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातून 27 हजार 14 कोटी रुपयांचा टोल वसूल केला गेला. यानंतर राजस्थानमधून 24,209 कोटी, महाराष्ट्रातून 21,105 कोटी आणि गुजरातमधून 20,607 कोटींची टोल वसुली झाली, अशी माहिती केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातील सूत्रांद्वारे समजते.
टोल वसुलीची रक्कम दरवर्षी वाढत असून 2020-21 मध्ये टोल नाक्याचे उत्पन्न 27,926 कोटी रुपये होते. तर 2021-22 मध्ये यात 6002 कोटी, 2022-23 मध्ये 14,104 कोटी आणि 2023-24 मध्ये 7850 कोटी रुपयांचा टोल वसूल केला. तसेच, 2024-25 फेब्रुवारीपर्यंत 54,820 कोटींचा एकूण टोल वसूल केला गेला. राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर 75 पेक्षा जास्त टोलनाके आहेत. मागील पाच वर्षांत मराठी माणसाने 21,105 कोटी 18 लाख रुपयांचा टोल दिला आहे.