टोमॅटोने शेतकऱ्यांना केले करोडपती, गावात लागले अभिनंदनाचे होर्डिंग
महेश महाले, नाशिक: कांद्याबरोबरच टोमॅटोचं पीक घेण्यात नाशिक जिल्हा नेहमीच अग्रेसर असतो. याच काळात मात्र कधी टोमॅटोचे भाव कोसळले तर कधी गगनाला भिडले. मात्र हेच टोमॅटो उत्पादक शेतकरी संपूर्ण देशात टोमॅटोमुळेच पुन्हा चर्चेत आले, परंतु ते एका वेगळ्या कारणाने. विशेष म्हणजे यासाठी या टोमॅटो उत्पादकांचे थेट गावात बॅनर झळकले आणि त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली आहे.
थेट ग्रामपालिकेच्या सरपंच उपसरपंचांनी लावलेले हे गावातील बॅनर, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत आणि त्याची चर्चाही होऊ लागली आहे. नेहमीच राजकारणी मंडळींचे बॅनर चर्चेत येत असतात मात्र गावा खेड्यातील शेतकऱ्यांचे बॅनर चर्चेत आल्याने, सोशल मीडियावर थेट कल्लाच झाला आहे. संपूर्ण देशात टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. शेती व्यवसायातील उत्तम नियोजन आणि निसर्गाची साथ मिळाल्याने काही मोजक्याच शेतकऱ्यांना अच्छे दिन आले. त्यामध्ये नाशिकच्या धुळवड गावातील शेतकऱ्यांची अक्षरशा लॉटरीच लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ११० उंबाऱ्याचे १५०० लोकसंख्या व ६०० एकर विस्तीर्ण भाग असलेले धुळवड गाव. दर वर्षी या सिझनमध्ये गावातील बहुसंख्य शेतकरी टोमॅटोचे पीक घेत असतात. यावर्षी देखील ११० शेतकरी घरांपैकी १०५ शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. गेली अनेक वर्ष पावसाने टोमॅटोचे नुकसान होत होते. तर हवा तसा भाव ही मिळत नव्हता. मात्र या वर्षी टोमॅटो विक्रीतून अनेक शेतकरी लखपती, करोडपती झाल्याने गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या या आनंदात गावाचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी देखील सहभाग घेतला, त्यामध्ये गावात अभिनंदनाचे होर्डिंग लावण्यात आले आहेत.
आता हे होर्डिंग सोशल मिडियाच्या माध्यमातून वायरल झाल्याने जिल्ह्यात चर्चेला ऊत आला आहे. दरवर्षी पेक्षा या वर्षी टोमॅटोच्या भावाने उच्चांक गाठल्याने, ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती, त्यांची तर एक प्रकारे लॉटरीच लागली. काही अक्षरशः लखपती तर काही करोडपती झाले. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. धुळवड गावातील १५ शेतकरी ‘करोडपती’ तर ५२ शेतकऱ्यांना ५० लाखाहून अधिक उत्पन्न मिळालेय. तर दररोज या आकडेवारीत भर पडतेय. गेली अनेक वर्षे शेतात मेहनत करुन काळया मातीत राबराब राबून देखील अनेकदा बळीराजाच्या हाताला काही लागत नव्हते. मात्र यंदा टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने, शेतकरी राजा लखपती झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या महिन्याभरापासून टोमॅटोचे दर कमालीचे वाढले आहेत. ज्याची लागवड अधिक आहे. त्याचे उत्पन्न करोडोत गेले आहे. त्यामुळे धुळवड गावात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी यांनी गावात बॅनर लावले आहे. हे बॅनर सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत असून ‘होय आम्ही करोडपती-लखपती धुळवडकर’ असा आशयाचा बॅनर लक्षवेधी ठरतोय. आतापर्यंत आपण राजकीय पुढार्यांच्या वाढदिवसाचे तसेच विविध उपक्रमांचे होर्डिंग्ज बघत असतो मात्र आता धुळवडकरांच्या या यशाचे होर्डिंग पहिल्यांदा लागल्याने चर्चा तर होणारच आहे.