हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; नेरूळ स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवा ठप्प
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. नेरूळ स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलसेवा बंद आहे. पनवेल ते वाशी स्थानकादरम्यानची लोकलसेवा अनिश्चित काळासाठी बंद आहे.
त्यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून कार्यालयात लेटमार्क लागणार आहे. नेरूळ स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली आहे. याचा परिणाम लोकल सेवेवर झाला आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान गेल्या एक तासापासून एकही लोकल धावलेली नाही.
मुसळधार पाऊस सुरू असल्याने हा तांत्रिक बिघाड दूर करण्यास अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. सकाळच्या सुमारास झालेल्या या बिघाडामुळे कामावर निघालेल्या लोकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. अनेक जणांनी पर्यायी मार्ग अवलंबला आहे. तर काहींनी दांडी मारली असून काहींनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारला आहे.