Plane Crash : कलबुर्गीहून बेळगावकडे जाणाऱ्या प्रशिक्षण विमानाचा कर्नाटकात अपघात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाची बातमी राज्यात ताजी असतानाच, कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात आणखी एका विमान अपघाताची घटना समोर आली आहे. कलबुर्गीहून बेळगावकडे जाणारे एक खासगी प्रशिक्षण विमान विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील मंगळूर गावाजवळ कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, दोन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे विमान रेड बर्ड एव्हिएशन ट्रेनिंग संस्थेचे (Red Bird Aviation Training Aircraft) खासगी प्रशिक्षण विमान होते. हे विमान वैमानिक प्रशिक्षणासाठी वापरण्यात येत होते. अपघाताची माहिती मिळताच बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
तांत्रिक बिघाड किंवा इंधन संपल्याचा प्राथमिक अंदाज
अपघातग्रस्त विमान कलबुर्गी येथून उड्डाण करून बेळगावच्या दिशेने जात होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला किंवा इंधन संपल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे विमानावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आणि अखेर विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वरजवळ असलेल्या मंगळूर गावाच्या परिसरातील एका शेतात हे विमान जमिनीवर कोसळले. अपघातावेळी विमानात सहाय्यक फ्लाइट इन्स्ट्रक्टर कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम संकर हे दोघे उपस्थित होते. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली असून त्यांना तात्काळ उपचारासाठी बीएलडीई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची प्रकृती सध्या स्थिर असून धोका टळला आहे.
स्थानिक नागरिकांची तत्परता ठरली मोलाची
विमान कोसळल्याचा मोठा आवाज ऐकताच मंगळूर गावातील स्थानिक नागरिक मदतीसाठी तात्काळ धावून आले. शेतात कोसळलेल्या विमानातून जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवण्यात आले. स्थानिकांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची बातमी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत परिसर सुरक्षित केला. या अपघाताची चौकशी सुरू असून, नागरी विमान वाहतूक विभागाकडून तांत्रिक तपास केला जाणार आहे.
चौकशीचे आदेश, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
एकीकडे देशात वैमानिक प्रशिक्षणाची मागणी वाढत असताना, अशा प्रकारच्या अपघातांमुळे प्रशिक्षण विमानांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण तपासल्यानंतरच स्पष्ट होणार असले, तरी प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाड किंवा इंधनाशी संबंधित समस्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे विमान सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
