Pratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांची एसटी स्थानकांना अचानक भेट; अधिकृत बसथांबे, हॉटेल्स, स्वच्छतेबाबत दिले महत्त्वाचे निर्देश
पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ST वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटी महामंडळाच्या अधिकृत बस थांब्यांना अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. काल, बुधवारी ते पंढरपूर येथील आगामी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर या ठिकाणी गेले होते.
या दौऱ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी विविध अधिकृत ST थांब्यांवरील हॉटेल्समधील अन्नपदार्थांची तपासणी केली. अन्नपदार्थ प्रवाशांना ताजे व दर्जेदार दिले जातात का, याची खातरजमा केली. त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही पाहणी करून स्वच्छतेबाबत विचारणा केली. काही महिलांनी स्वच्छतागृह स्वच्छ नसल्याबाबत तक्रारी केल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित हॉटेल मालकांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर त्रुटी दूर केल्या नाहीत, तर परवाने रद्द करण्यात येतील. तसेच, अन्नपदार्थांचे दर वाजवी ठेवावेत आणि प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले.
फक्त अधिकृतच नव्हे, तर काही अनधिकृत बस थांब्यांवर एसटी गाड्या थांबत असल्याचे निदर्शनास येताच मंत्री नाईक यांनी त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी केली. त्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ वातावरण व निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचे दिसून आले. त्यांनी अशा परिस्थितीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या दौऱ्यात त्यांनी भिगवण बसस्थानकास भेट देत तेथील दुरवस्थेची पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारींनुसार त्यांनी महामंडळाच्या बांधकाम विभागाचे व्यवस्थापक दिनेश महाजन यांना नवीन बसस्थानकाच्या इमारतीसंदर्भातील प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले.
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या अचानक तपासणीमुळे राज्यभरातील एसटी बस थांब्यांवरील स्वच्छता, अन्नाचा दर्जा आणि प्रवाशांच्या सुविधा याबाबत आता सर्वच हॉटेल चालकांना ST प्रवाशांची काळजी घेणे अनिवार्य ठरणार आहे.