Thane : ठाणेकरांना खुशखबर! मुंबई मेट्रो-11 प्रकल्पाला मंजुरी; ठाणे ते गेटवे प्रवास होणार अधिक सुलभ
थोडक्यात
नवीन मार्गिका वडाळा येथे मेट्रो 4 शी जोडली जाणार असल्याने ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया असा प्रवास एकाच साखळीत पूर्ण होऊ शकेल
एमएमआरडीए मेट्रो 4 च्या बांधकामावर काम करत असून या वर्षअखेर पहिला टप्पा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे
वडाळा येथील आणिक डेपोपासून सुरू होणारी ही मार्गिका गेटवे ऑफ इंडिया येथे समाप्त होईल.
मुंबईतील आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका-11 प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 23 हजार 487 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून 17.51 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेतील सुमारे 70 टक्के भाग भूमिगत असणार आहे. या मार्गिकेत एकूण 14 स्थानके प्रस्तावित असून त्यापैकी 13 स्थानके भुयारी आणि एक स्थानक जमिनीवर उभारण्यात येणार आहे.
ही नवीन मार्गिका वडाळा येथे मेट्रो 4 शी जोडली जाणार असल्याने ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया असा प्रवास एकाच साखळीत पूर्ण होऊ शकेल. मात्र प्रवाशांना वडाळा येथे मेट्रो बदलावी लागेल. सध्या एमएमआरडीए मेट्रो 4 च्या बांधकामावर काम करत असून या वर्षअखेर पहिला टप्पा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, तर 2027 पर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित करण्याचा मानस आहे.
मेट्रो 11 च्या उभारणीची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे असून लवकरच निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. या मार्गिकेच्या पूर्णत्वानंतर दक्षिण मुंबईतून ठाण्यापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होईल.
वडाळा येथील आणिक डेपोपासून सुरू होणारी ही मार्गिका गेटवे ऑफ इंडिया येथे समाप्त होईल. प्रवाशांना मेट्रो 3 आणि मेट्रो 4 मार्गिकेशी जोडणी मिळणार असून त्यामुळे मुंबईच्या मध्य व दक्षिण भागातून ठाणे आणि उपनगरांकडे मेट्रोद्वारे प्रवास सोयीस्कर होणार आहे.