Metro 4 News : प्रवास होणार सुसाट! मेट्रो 4 चा मोठा टप्पा पूर्ण, मुंबई–ठाणेकरांना दिलासा
मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई मेट्रो मार्गिका 4 ने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला असून, या प्रकल्पामुळे भविष्यातील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. भांडुप पश्चिम येथे तब्बल 325 मेट्रिक टन वजनाचे तीन भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लाँच करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया अत्यंत जटिल आणि तांत्रिक स्वरूपाची असून, आठ हेवी ड्युटी क्रेन्स आणि 12 मल्टी-अॅक्सल वाहनांच्या मदतीने हे काम पार पाडण्यात आले.
या कामासाठी एमएमआरडीएने महानगरपालिका (BMC), बेस्ट, भांडुप वाहतूक पोलीस, भांडुप पोलीस तसेच स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांशी समन्वय साधत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. विशेष म्हणजे, चार रात्री लागणारे हे काम केवळ दोन रात्रींमध्ये पूर्ण करण्यात आले. या मोहिमेत 35 अभियंते, 100 हून अधिक कुशल कामगार, 70 वाहतूक वॉर्डन आणि 25 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी सहभागी होते. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची विशेष दक्षता घेण्यात आली.
ठाणे आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
मेट्रो 4 आणि 4-अ या मार्गिका पुढे वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो 11 शी जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे एकूण 58 किलोमीटर लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका अस्तित्वात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच ऑक्टोबर 2026 पर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांसाठी खुले होतील, अशी ग्वाही दिली आहे. मेट्रो मार्ग 4 (वडाळा–कासारवडवली) आणि 4-अ (कासारवडवली–गायमुख) च्या प्राधान्य टप्प्यावर तांत्रिक तपासणी आणि ट्रायल रन ची सुरुवातही झाली आहे. गायमुख जंक्शन ते कासारवडवली–विजय गार्डन या मार्गावर चाचणी यशस्वी ठरली असून, मेट्रो सेवेकडे आणखी एक पाऊल टाकण्यात आले आहे.
मेट्रो 4 आणि 4-अ मार्गिकेची वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माहितीनुसार, घाटकोपर–मुलुंड–गायमुख या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी 35 किलोमीटर असून, यामध्ये मेट्रो 4 ची 32 किमी आणि मेट्रो 4-अ ची 2.88 किमी लांबी आहे. या मार्गावर एकूण 32 स्थानके असणार असून, प्रकल्पाचा खर्च सुमारे 16 हजार कोटी रुपये अपेक्षित आहे. मेट्रो 4, 4-अ, 10 आणि 11 साठी भोगरपाडा येथे 45 हेक्टरवर संयुक्त डेपो उभारण्यात येत आहे. ही मेट्रो पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर यांना जोडणारी महत्त्वाची वाहतूक साखळी ठरणार आहे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर दररोज 13 लाखांहून अधिक प्रवासी या मेट्रोचा वापर करतील, असा अंदाज आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, प्रवासाचा वेळ आणि प्रदूषण दोन्ही घटणार आहे.
