Mahua Moitra On Amit Shah : "अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे"; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त वक्त्तव्य
तृणमूल काँग्रेस (TMC) च्या खासदार महुआ मोइत्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यावेळी त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अतिशय गंभीर आणि वादग्रस्त विधान केले आहे.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना महुआ मोइत्रा यांनी म्हटले की, “जर अमित शाह बांगलादेशातून होणारी घुसखोरी थांबवू शकत नसतील, तर त्यांचे शीर कापून पंतप्रधानांच्या टेबलावर ठेवले पाहिजे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली असून, विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्याची तीव्र टीका होत आहे.
महुआ मोइत्रा यांनी स्पष्ट केले की, देशाच्या सीमांची सुरक्षा करणे ही गृहमंत्रालयाची थेट जबाबदारी आहे. “जेव्हा पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून घुसखोरीबाबत भाष्य केले, तेव्हा पहिल्या रांगेत बसलेले गृहमंत्री फक्त टाळ्या वाजवत होते. प्रत्यक्षात मात्र गृह मंत्रालय देशाच्या सुरक्षेचे कर्तव्य निभावण्यात अपयशी ठरले आहे,” असे त्या म्हणाल्या.
या विधानामुळे महुआ मोइत्रा पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीतले हे पहिलेच वादग्रस्त वक्तव्य नाही. यापूर्वीही त्या अनेकदा अशा विधानांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. संसदेत अपशब्दांचा वापर, जैन समाजावर टिप्पणी, माजी मुख्य न्यायमूर्तींवर केलेले वक्तव्य, ‘काली’ देवीसंदर्भात वादग्रस्त विधान आणि ‘कॅश-फॉर-क्वेरी’ प्रकरण अशा अनेक वादांमध्ये त्या सापडल्या आहेत.
2023 साली लोकसभेत सत्ता पक्षातील एका खासदाराविरोधात त्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप झाला होता. भाजप खासदारांनी त्यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र, महुआ यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार देत त्या शब्दाचा अर्थ अरबी भाषेत ‘पापी’ असा होतो, असे स्पष्टीकरण दिले होते. यावेळी अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांनी त्यांना संयमित भाषा वापरण्याचा सल्ला दिला होता, तरीही महुआ मोइत्रा आपल्या विधानावर ठाम राहिल्या होत्या.
महुआ मोइत्रा या त्यांच्या बेधडक आणि आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जातात. मात्र, त्यांच्या विधानांमुळे वारंवार राजकीय वर्तुळात गदारोळ निर्माण होतो. त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे आणि पुढील काही दिवस राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.