त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला माजी विश्वस्तांचा विरोध, म्हणाल्या, "चुकीचा..."
महाशिवरात्रीनिमित्त ठीकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी व तिचे सहकलाकार शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी यासंदर्भात देवस्थानाला पत्र लिहिले आहे.
महाशिवरात्री निमित्त मागील वर्षी सुरु करण्यात आलेल्या सोहळ्याप्रमाणे यावर्षीदेखील 25 फेब्रुवारी रोजी हळदीचा समारंभ होणार आहे. यानिमित्त मंदिराला फुलांची आरास केली जाणार आहे. मंगळवारी सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत बासरी वादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतरही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र यामध्ये प्राजक्ता माळीच्या नृत्याचा कार्यक्रमदेखील होणार आहे. ज्याला विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला.
ललिता शिंदे काय म्हणाल्या?
"महाशिवरात्रीचा अत्यंत पवित्र दिवस आहे. येथे धार्मिक कार्यक्रमच झाले पाहिजेत. प्राजक्ता माळी शिवस्तुती करणार असतील तर त्याचा पुन्हा एकदा विचार व्हावा. कारण मी स्वतः या मंदिराची माजी विश्वस्त आहे. येथे शास्त्रीय नृत्य व्हायला काहीही हरकत नाही. मात्र सेलिब्रिटींचा आणून एक वेगळा पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने सुरु केला आहे. हे चुकीचा".