Tuljapur Drugs Case: Special Report ड्रग्ज प्रकरणाने तुळजापूरकर दहशतीखाली
तुळजापूर म्हटलं की तुमच्या-आमच्या डोळ्यांसमोर आई तुळजाभवानीची मूर्ती येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तुळजापूरची नवी ओळख निर्माण झाली आहे. ती म्हणजे ड्रग्जचं रॅकेट. या रॅकेटमध्ये पुजाऱ्यांचाही संबंध असल्याचा आरोप झाला. म्हणून पोलिसांनी आता चौकशी सुरू केलीय. त्याताच भाग म्हणून, तुळजापुरात अनेक सर्वसामान्य नागरिकांना नोटिसा धाडल्या आहेत. त्यामुळे या नोटिसांची नवी दहशत निर्माण झाली आहे.
तब्बल दोन वर्षांपासून तुळजापुरात ड्रग्जची विक्री करणारं रॅकेट असल्याचं उघड झालं आणि खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे या ड्रग्जच्या रॅकेटमध्ये पुजाऱ्यांचाही संबंध असल्याचे आरोप झाले. त्यामुळे पोलीस चांगलेच सतर्क झाले आहेत. आता पोलिसांनी अनेक मार्गांनी झाडाझडती घेत, लोकांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यात अनेक व्यावसायिक, व्यापारी, रिक्षावाले, टपरी चालक, गृहिणी आणि शिक्षकांना नोटिसा धाडल्या आहेत. आणि त्याचं कारण म्हणजे ऑनलाईन ट्रान्झेक्शन आहे.
स्थानिक नागरिकांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला. त्यावेळेस म्हणाले की, "तुळजापुरात पानाची टपरी चालवणारे शहाजी कवडे यांनाही मुलगा आणि सूनेच्या नावाने नोटीस आलीय. त्यांनी घेतलेल्या बांधकाम साहित्याचे ऑनलाईन पेमेंट ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पाठवलंय. म्हणून त्यांना चौकशीला सामोरे जावं लागलंय". "तुळजापूर ड्रग्स प्रकरणामुळे अनेक सर्वसामान्य लोक त्रासून गेले आहेत. ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही अशा लोकांनाही नोटिसा आल्याने दहशत पसरलीय".
पोलिसांनी नोटीस दिलेल्या लोकांचा ड्रग्ज प्रकरणात नेमका सहभाग कसा आहे? हे चौकशीनंतर समोर येईलच. पण, पोलिसांवर राजकीय दबाव असल्यानेच 21 आरोपी फरार असल्याची चर्चा तुळजापुरात सुरूय. असं असलं तरी तुळापुरातील ड्रग्जचं रॅकेट नेस्तनाबूत करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. असे एका स्थानिक व्यावसायिकाने म्हटले आहे.