Uttar Pradesh : महादेव मंदिरात श्रावण सोमवारच्या दिवशी शोकांतिका! वीज पडून दोघांचा मृत्यू, 40 जखमी
श्रावणी सोमवारनिमित्त हजारो भाविकांनी आज पहाटेपासून शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली. मात्र, या श्रद्धेच्या पर्वावर एक दुर्दैवी घटना घडली असून, उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगढ येथील अवसानेश्वर महादेव मंदिरात झालेल्या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 40 जण जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना पहाटे तीनच्या सुमारास घडली. श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला होता. मंदिराबाहेर पत्र्याच्या शेडखाली रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर अचानक वीजेचा तडाखा बसला.
त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. धावपळीत चेंगराचेंगरी झाली. विजेच्या धक्क्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी एकजण बाराबंकी जिल्ह्यातील मुबारकपुरा गावचा रहिवासी प्रशांत (वय 22) होता. दुसरा मृत भाविक देखील त्याच गावातील असल्याची माहिती आहे. दोघांनाही भाविकांनी तातडीने त्रिवेदीगंज सीएचसी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शी भाविकांच्या माहितीनुसार, मंदिराच्या परिसरातील विजेच्या तारेवर एका माकडाने उडी मारली. त्यामुळे ती तार तुटून खाली पत्र्याच्या शेडवर कोसळली.
या शेडखाली शेकडो भाविक उभे होते. विजेचा झटका बसल्यानंतर लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला, धावपळ सुरू झाली आणि चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. काही जणांना विजेच्या धक्क्याने भाजल्याचेही सांगण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी त्रिवेदीगंज आणि इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. भाविकांच्या सुरक्षिततेबाबत मंदिर प्रशासन आणि विद्युत विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांनी असा सवाल उपस्थित केला की, भाविकांची गर्दी माहीत असूनही विजेच्या तारांची योग्य देखभाल का झाली नाही? दरम्यान, उत्तर प्रदेश शासनाने या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे. श्रावणी सोमवारच्या पवित्र दिवशी घडलेली ही दुर्घटना भाविकांमध्ये भीती आणि दु:ख यांचं वातावरण निर्माण करून गेली आहे. यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.