Uddhav Thackeray Press Conference
Uddhav Thackeray Press Conference

राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, "एकाधिकारशाही देशाला..."

मातोश्रीवर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली.
Published by :

भारताला कणखर नेतृत्व देण्यासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, असं राज ठाकरे म्हणाले, यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, एकाधिकारशाही देशाला घातक आहे. हुकूमशाहाला पुन्हा स्वीकारणं देशाला घातक आहे. एक काळ असा होता, त्यावेळी आपल्याला वाटत होतं की, संमिश्र सरकार नको. पण इतिहास पाहिला तर अटल बिहारी वाजपेयी यांनीसुद्धा संमिश्र सरकार चालवलं होतं. नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी सुद्धा संमिश्र सरकार चालवलं. बहुतेकवेळा संमिश्र सरकारच्या काळातच देशाची प्रगती चांगल्या प्रकारे झाली आहे. आम्हाला देश मजबूत पाहिजे. सरकार संमिश्र पाहिजे. एका व्यक्तीच्या हातात संपूर्ण देश दिला, तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही.

मातोश्रीवर पत्रकार परिषदेत ठाकरे पुढे म्हणाले, मविआला पाठिंबा वाढतोय तसंच महायुतीलाही बिनशर्त पाठिंबा मिळत आहे, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्यांचं कौतुक करतोय. काही लोक उघडपणे बिनशर्त पाठिंबा देत आहेत. काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत. ही नाटकं आता जनता ओळखत आहे. म्हणून यावेळी हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढत येणाऱ्या लोकसभेत होणार आहे. हे आता लोकांना कळलं आहे. जो देईल साथ, त्यांचा करु घात, अशी व्यक्ती आम्हाला नको आहे.

सर्वांना सोबत घेऊन जाणारं इंडिया आघाडीचं सरकार देशाची प्रगती करेल. दहा वर्षांपासून एक व्यक्ती एक पक्ष असं चित्र आहे. आता ते संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागले आहेत. पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही वृत्ती घातक आहे. म्हणून मला असं वाटतं की, एका व्यक्तीच्या हातात देश देणं हे धोकादायक आहे. सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारीने त्रासले आहेत. आम्हाला भारत सरकार पाहिजे. एका व्यक्तीचं मोदी सरकार नको. त्यांनी २०१४ पासून जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण झाली नाहीत.

देशातील भ्रष्टाचार संपला नाही. इतर पक्ष त्यांनी भ्रष्टाचारमुक्त केले. महायुतीच्या एकत्रित सभा होत आहेत, मविआच्या सभा कधी होणार? या प्रश्नाचं उत्तर देताना ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सभा आम्ही सुरु करतोय. महायुतीच्या सभा जरी सुरु असल्या, तरी युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाहीय. नुसत्या युतीच्या सभा घेऊन काही उपयोग नाही. फॉर्म्युला नाही आणि सभा घेतात, त्याला काही अर्थ नाही. आम्ही मविआच्या उमेदवारांची, जागांची घोषणा केली आहे. आमच्या मविआच्या सभाही सुरु होतील.

वेगवेगळ्या पक्षातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सरकारला कंटाळले आहेत. या सरकारच्या कारभाराला कंटाळून त्यांना आता एकमेव आशा राहिली आहे. देशात इंडिया आघाडी, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणं हीच आशा राहिली आहे. जळगावात शिवसेना लढतेय आणि जिंकणार. शिवसेनेचा विजय अधिक मोठा व्हावा, या विश्वासाने हे लोक शिवसेनेत आले आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com