Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा सादर, 'या' महत्त्वाच्या मुद्द्यांचा केला समावेश, उद्धव ठाकरे म्हणाले...

मोदी-शहा सांगतात, मी राम मंदिरात गेलो नाही. पण मोदी-शहा अजून तुळजा भवानी मातेच्या मंदिरात का गेले नाहीत, असा सवाल उपस्थित करुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
Published by :

Uddhav Thackeray Press Conference : दिल्ली सरकारचे अधिकार काढण्यासाठी मोदी सरकारने कोर्टाच्या विरोधात जाऊन तसा निर्णय घेतला. धार्मिक मुद्द्यावरून ते आम्हाला शिकवत आहे. भाजप पराभवाच्या भीतीत आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामनाम घ्यावा, असं चित्र आहे. मोदी सरकारच्या मनात तुळजा भवानी मातेबद्दलही आकस आहे. कारण मोदी इतर सर्व मंदिरात गेले आहेत. पण तुळजा भवानी मंदिरात गेले नाही. मोदी-शहा सांगतात, मी राम मंदिरात गेलो नाही. पण मोदी-शहा अजून तुळजा भवानी मातेच्या मंदिरात का गेले नाहीत, असा सवाल उपस्थित करुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेनं (ठाकरे गट) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकेर म्हणाले, युतीतला एक सहकारी पक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आम्ही गेलो होतो. तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे. स्वत: राष्ट्रपतीसुद्धा आश्चर्यचकीत होते. देशाला आनंद आणि आश्चर्य वाटलं होतं. कारण बऱ्याच वर्षानंतर एका पक्षाची सत्ता आली होती. आम्ही एनडीए म्हणून एकत्र होतो. पण तेव्हाही भारतीय जनता पक्षाने बहुमताचा आकडा स्पर्श केला होता. त्यानंतर त्यांनी नोटबंदी केली. २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर आले. ३७० कलम हटवलं. तेव्हाही आम्ही सोबत होतो. आता मात्र त्यांना आता पाशवी बहुमत पाहिजे, जेणेकरुन ते देशाची घटनाच बदलून टाकतील. देशातील लोकशाही मारून टाकतील.

त्यांची स्वप्न आता उघड झाली आहे. काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा सादर केला आहे. इंडिया आघाडीचा जाहीरनामा सादर केला आहे. शरद पवारांनीही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आम्ही सुद्धा शिवसेनेचा वचननामा जाहीर करत होतो. महाराष्ट्रासाठी ज्या काही गोष्टी प्राधान्याने व्हायला पाहिजे, त्या आम्ही शिवसेनेच्या वतीनं (ठाकरे गट) वचननामाच्या माध्यमातून प्रकाशित करत आहोत. मी शिवसेनेच्या वतीनं जनतेला विनंती केलीय की, तुमचे आशीर्वाद असुद्या. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडीचं सरकार गद्दारी करुन पाडलं. त्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम हे पोकळ इंजिन सरकार करत आहे. त्याला केंद्राचा आशीर्वाद आहे.

महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले जात आहेत. महाराष्ट्रातील हिरे व्यापार पळवला. क्रिकेटचा सामना पळवला. महाराष्ट्राचं वैभव लुटलं जातय. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर ही लूट आम्ही थांबवू. महाराष्ट्राचे वैभव मविआच्या काळात वाढत होतं. इंडिया आघाडीचं सरकार आणि विधानसभेत मविआचं सरकार आल्यावर मोदी सरकारने महाराष्ट्रात जो खड्डा पाडला आहे, तो भरून काढू. महाराष्ट्राचं वैभव अधिक जोमाने प्राप्त करू. आम्ही गुजरातचं काही ओरबडून नेणार नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर प्रत्येक राज्याचा आम्ही मान सन्मान ठेऊ. वित्तीय केंद्र महाराष्ट्रात नव्याने उभं करु. जेणेकरुन रोजगाराच्या अनेक संध्या उपलब्ध होतील. तरुणांना रोजगार मिळेल.

ग्रामिण भागात सुद्धा अनेक तरुण शिकलेले आहेत, पण तिथे नोकरीची संधी नसल्याने त्यांना स्थलांतर करावं लागत आहे. त्यांना त्यांच्या गावात, जिल्ह्यात रोजगार कसा निर्माण होईल, याचाही आम्ही विचार करणार आहोत. जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे आणून अद्ययावत करण्यात येतील. ग्रामिण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विविध सुविधा दिल्या जातील. किसान सन्मान योजनेचा गवगवा केला जात आहे.

पण शेतकरी म्हणतात, आमच्याकडे असणाऱ्या खतं, बी-बियाणे, औजारे, वीज-पंप या सर्व गोष्टींसाठी केंद्र सरकार आमच्याकडून जीएसटी घेतं आणि आम्हाला फक्त सहा हजार रुपये वर्षाला देतं. शेतकऱ्याला लागणाऱ्या वस्तु आम्ही जीएसटीमुक्त करु. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं खोटं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं.

कापूस, सोयाबीन, डाळी साठवण्यासाठी आम्ही त्यांना गोदाम बांधून देऊ. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा एक वेगळी कल्पना काढली होती. ज्याला बाजारभाव आहे तेच उत्पादन घ्यायचं. जे विकेल, ते पिकेल. जगभरात कोणत्या पीकाला मागणी असणार आहे, त्याप्रमाणे शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं. कर्ज फेडू शकत नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. म्हणून शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवला आहे. गद्दारांचं सरकार आल्यावर गुंतवणूक थांबवी, पण आम्ही पर्यावरणस्नेही उद्योग आणू. नाणार, बारसू, जैतापूर, वाढवण बंदरासारखे विनाशकाली प्रकल्प आम्ही राज्यात येऊ देणार नाही.

आयुष्य सुखानं आणि आनंदानं जगता यावं, त्यासाठी इंडिया आघाडीचं सरकार काम करणार आहे. महिलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के जागा देऊ. मोदी सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. तो आम्ही मिळवून देऊ. महाविकास आघीडीच्या तीन वेगवेगळ्या पक्षांनी त्यांचे स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत, त्यांच्यात एकजूट नाही आहे का, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाचा वेगळा पक्ष आहे. आम्ही आघाडी केली म्हणजे पक्ष विलीन केले नाहीत. ज्यावेळी शिवसेना-भाजपचा जाहीरनामा वेगळा होता. आमचा वचननामा वेगळा होता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com